वाळवा पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात चिरीमिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:57+5:302020-12-12T04:41:57+5:30
इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीमध्ये विविध विभागांत मोठ्या प्रमाणात चिरीमिरी सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. इस्लामपुरातील एका ...
इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीमध्ये विविध विभागांत मोठ्या प्रमाणात चिरीमिरी सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. इस्लामपुरातील एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याची बहीण सेवानिवृत्त झाली. त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासंदर्भातील कामासाठी एका कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याची तक्रार लोकप्रतिनिधींकडे केली, परंतु यावर काहीच कारवाई न झाल्याने शहरातील हा लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे समजते.
वाळवा तालुक्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील सेवक व अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नाही. याचाच फायदा अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उठविला आहे. पंचायत समितीच्या कार्यालयातील प्रत्येक विभागातील कागदावर वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही. तर महसूल, नगरपालिका आदी कार्यालयांत विविध फायली पुढे सरकण्यासाठी चिरीमिरीची व्यवस्था करावी लागते. यासाठी या कार्यालयाच्या परिसरात झिरो कर्मचारी आणि विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांची रेलचेल आहे.
चाैकट
न्याय कसा मिळणार
मध्यंतरीच्या काळात विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना लाचलुचपत पथकाने पकडल्याच्या घटना ताज्याच आहेत. या विविध कार्यालयांतील अशा तक्रारी त्यांच्या वरिष्ठांना सांगितल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.