आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:21 PM2022-07-11T12:21:51+5:302022-07-11T12:27:02+5:30
गेली दोन वर्षे गाड्या आणि प्रवाशांअभावी ओसाड पडलेले मिरज जंक्शन पुन्हा एकदा गजबजून गेले
सांगली : गेली दोन वर्षे गाड्या आणि प्रवाशांअभावी ओसाड पडलेले मिरज जंक्शन पुन्हा एकदा गजबजून गेले आहे. सर्व एक्स्प्रेस गाड्या आणि काही पॅसेंजर गाड्या पुर्ववत झाल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जादा गाड्या धावत असल्यानेही स्थानक ओव्हरफुल्ल झाले आहे. सहा प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी गाड्या थांबत आहेत.
आषाढी यात्रेनिमित्त या मार्गांवर रेल्वे धावू लागल्याने प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मिरज ते लातूर, कुर्डुवाडी आदी मार्गांवर रेल्वे गाड्या धावत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातून हजारो विठ्ठलभक्त देवाच्या गाडीतून प्रवासाचा आनंद लुटत आहेत.
2011 पर्यंत मिरज ते पंढरपूर आणि पुढे बार्शीला धावणारी पॅसेंजर गाडी देवाची गाडी म्हणून ओळखली जायची. 2011 नंतर ब्रॉडगेज झाल्यानंतर गाडीचा वेग, संख्याही वाढली. पण विठ्ठलभक्तांची श्रद्धा कायम आहे. पंढरपूर यात्रेनिमित्त जादा गाड्या धावत असल्याने मिरज जंकशन गजबजून गेले. सर्व म्हणजे सहा प्लॅटफॉर्मवर गाड्या थांबत असून अडीच वर्षानंतर प्रथमच इतकी गजबज पाहायला मिळत आहे.