Sangli: दरीबडची येथे अंगणवाडीत शिजविलेल्या भातात सापडल्या अळ्या, पालकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:13 PM2024-10-09T13:13:11+5:302024-10-09T13:13:26+5:30
दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे चौगुलेवाडी येथील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारातील भातात अळ्या सापडल्या. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. ...
दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे चौगुलेवाडी येथील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारातील भातात अळ्या सापडल्या. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. ही घटना सोमवार (दि.७) रोजीच्या मध्यान्ह भोजनात घडली.
अंगणवाडी क्र: १३१ मध्ये २० मुले आहेत. आरोग्य सेविका पद सेवानिवृत्त झाल्याने रिक्त आहे. सध्या अंगणवाडीचा कारभार मदतनीस चालविते. मुलांना खिचडी, तिखट भात, गोड भात, वरण भात, वटाणे दिले जातात. कधीतर गव्हाची लापसी दिली जाते. सोमवारी मुलांना शिजवून दिलेल्या भातात अळ्या आढळून आल्या. श्रावणी महादेव चौगुले व इतर दोन मुलींच्या खायला भातात अळ्या आढळल्या. मुलांनी खायला दिलेला भात न खाता डब्यात घेऊन पालकांना दाखविला. पालकांनी भात पाहीले असता भातात अळ्या आढळून आल्या.
संतप्त झालेल्या पालकांनी याची माहिती सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना दिली. अंगणवाडीला कुलूप घालण्याचा पालकांनी इशारा दिला होता. याची माहिती अंगणवाडी पर्यवेक्षक शैला मुधोळ यांना दिली.
आरोग्य सेविका पद रिक्त
चौगुलेवाडी येथील अंगणवाडीत आरोग्य सेविका पद सेवानिवृत्त झाल्याने वर्षापासून रिक्त आहे. एकात्मिक बालविकास विभागाने आरोग्य सेविकासाठी अर्ज मागविले आहेत. या अंगणवाडीबाबत अनेक वर्षांपासून पालकाच्या तक्रारी आहेत. सात वर्षांपूर्वी शाळा सुटल्यानंतर झोपलेल्या मुलांना अंगणवाडीतच कोंडून गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी मोठा वाद झाला होता.