सांगलीत मृतदेहाचा अंतिम प्रवासही महापुरातूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:32+5:302021-07-26T04:24:32+5:30
सांगली : कृष्णेच्या महापुरामध्ये अनेक वेगवेगळ्या संकटांचा सांगलीकरांना सामना करावा लागत आहे. वृद्धापकाळाने मरण पावलेल्या एका महिलेचा मृतदेह पुरातूनच ...
सांगली : कृष्णेच्या महापुरामध्ये अनेक वेगवेगळ्या संकटांचा सांगलीकरांना सामना करावा लागत आहे. वृद्धापकाळाने मरण पावलेल्या एका महिलेचा मृतदेह पुरातूनच बाहेर काढावा लागला.
गावभागातील एका वृद्धेचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. सध्या हा परिसर पूर्णत: पाण्यात गेला आहे. तळमजल्यात पाणी शिरल्याने रहिवाशी वरील मजल्यांवर राहण्यास गेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सामाजिक कार्यकर्त्यांकडून बोटीतून केला जात आहे. अशा गंभीर स्थितीत वृद्धेचा मृत्यू झाल्याने बाका प्रसंग ओढवला होता. मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे याची चिंता नातेवाइकांना लागून राहिली होती. त्यांनी महापालिकेशी संपर्क साधला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रॉयल बोट क्लबच्या मदतीने कुटुंबाशी थेट संपर्क केला. वृद्धेचा मृतदेह झोळीतून बाहेर आणला. बोटीत ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढला. तेथून शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी पाठवला.
अमरधाम स्मशानभूमीत सध्या पाणी शिरले आहे. त्यामुळे कुपवाडच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.