बापूसाहेब मगदूम यांना अखेरचा निरोप सांगलीत अंत्यसंस्कार : अंत्ययात्रेत हजारो हमाल, असंघटित महिलांची उपस्थिती; मान्यवरांकडून आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:56 PM2018-09-04T23:56:12+5:302018-09-04T23:57:16+5:30
हमाल पंचायत व हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब भुजाप्पा मगदूम (वय ८८) यांना मंगळवारी साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सोमवारी रात्री अकरा वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने
सांगली : हमाल पंचायत व हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब भुजाप्पा मगदूम (वय ८८) यांना मंगळवारी साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सोमवारी रात्री अकरा वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने हमाल, कष्टकऱ्यांसह पुरोगामी चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने खणभाग येथे त्यांच्या हिंद मजदूर संघाचे कार्यालय असणारी ‘कष्टकºयांची दौलत’ ही इमारत पोरकी झाली असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
मगदूम यांची समाजवादी, पुरोगामी, कष्टकरी, कामगारांचे नेते म्हणून राज्यात ओळख होती. ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे सहकारी म्हणून ते ओळखले जात. आढाव यांच्यासोबत त्यांनी हमालांच्या हक्कासाठी व प्रश्नांवर अनेक आंदोलने करुन त्यांना सन्मान मिळवून दिला. हळदीच्या गिरणीत काम करणाºया महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीही लढा उभारला होता. हमाल पंचायतीचे सरचिटणीस म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत होते. राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष विकास मगदूम यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा विकास यांच्यासह पत्नी चंपावती, मुली सुनीता व अनिता, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
मंगळवारी सकाळी वसंतनगर येथील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा सुरू झाली. मार्केट यार्ड येथील हमाल भवनमध्ये त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथे महापौर संगीता खोत, माजी केद्रींय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे संचालक, हमाल-मापाडी यांनी अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर पंचमुखी मारुती रोडवरील ‘कष्टकºयांची दौलत’मध्ये पार्थिव आणण्यात आले. ज्या ठिकाणी बसून बापूसाहेबांनी हमालांसह कष्टकरी, असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविले, त्या इमारतीने त्यांना अखेरचा निरोप दिला. पंचमुखी मारुती रोडवरून अंत्ययात्रा येथील कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत पोहोचली. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, बापूसाहेब पाटील, गौतमीपुत्र कांबळे, बाळासाहेब कलशेट्टी, अॅड्. के. डी. शिंदे, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. धनाजी गुरव, दिलीप सूर्यवंशी, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, संपतराव पवार, नामदेव करगणे, गोपाळ मर्दा, शरद शहा, सदाशिव मगदूम, शैलेश पवार, वि. द. बर्वे, नितीन चव्हाण, मुजीर जांभळीकर, अरुण खरमाटे, बाळासाहेब बंडगर, नगरसेवक मनगू सरगर, मनोज सरगर, प्रशांत पाटील, सुरेश दुधगावकर, शालन मोकाशी, विद्या स्वामी, ज्योती अदाटे, महेश खराडे, डॉ. संजय पाटील, राहुल थोरात, प्रा. रवींद्र ढाले, प्रा. अमर पांडे, किरणराज कांबळे आदींसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार, हमाल उपस्थित होते. मगदूम यांचे अखेरचे दर्शन घेताना हमाल आणि कष्टकºयांना अश्रू अनावर झाले होते.
सांगलीत मंगळवारी बापूसाहेब मगदूम यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्रद्धांजली वाहताना बाबा आढाव, शेजारी डॉ. बाबूराव गुरव, शंकर पुजारी, शाहिन शेख उपस्थित होते.