गणपतराव आंदळकरांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:02 AM2018-09-18T00:02:53+5:302018-09-18T00:02:57+5:30

The last message to Ganpatrao Andalkar | गणपतराव आंदळकरांना अखेरचा निरोप

गणपतराव आंदळकरांना अखेरचा निरोप

Next

शिराळा/पुनवत : लाल मातीतल्या कुस्ती कलेला आपल्या बलशाली खेळाद्वारे जगभर कीर्ती मिळवून देणाऱ्या हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्यावर त्यांच्या जन्मगावी पुनवत (ता. शिराळा) येथे सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत कुस्ती क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या निधनामुळे शिराळा तालुक्यातील पुनवत, खवरेवाडी, माळवाडी, शिराळे खुर्दसह परिसरातील घरगुती व सर्वच मंडळांच्या गणेशमूर्र्तींचे सकाळीच विसर्जन करण्यात आले. मंडळांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. दिवसभर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी आंदळकर यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.
दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी शिराळे खुर्द येथे पार्थिव दाखल झाले. टाळ-मृदंगाच्या साथीने साडे चार वाजता अंत्ययात्रा सुरू झाली. पाच वाजता पुनवत येथे अंत्ययात्रा आली. सुरुवातीला ग्रामदैवत हनुमान मंदिराजवळ काही वेळ थांबवून त्यानंतर पुनवत येथील आंदळकर यांच्या घरी पार्थिव आणण्यात आले. तेथून गावाच्या पूर्वेकडील गावठाण चौकातील स्मशानभूमीत सायंकाळी साडे सहा वाजता पार्थिव आणण्यात आले. पावणे सात वाजता पोलिसांनी बंदुकीच्या २१ फैरी झाडून त्यांना सलामी दिली. त्यानंतर मुलगा अभिजित यांनी भडाग्नि दिला. आपल्या लाडक्या हिंदकेसरीला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
अंत्यसंस्कारावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, अमरसिंह नाईक, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, पंचायत समिती उपसभापती सम्राटसिंह नाईक, उदयसिंगराव नाईक, अभिजित पाटील, प्रकाश धस, सुखदेव पाटील, के. डी. पाटील, रणजितसिंह नाईक, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, केदार नलवडे, आॅलिम्पिक वीर बंडा नाना पाटील, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आनंदराव धुमाळ, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, बापू लोखंडे, राणा नाईक, दत्ता गायकवाड,उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, नामदेव भोसले, भीमराव माने, अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार, दिलीप महान, माणिक पवार, सरपंच विजय कोळेकर, उपसरपंच सुखदेव कोळेकर, तानाजी सोरटे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, तहसीलदार शीतलकुमार यादव, उपविभागीय पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, ईश्वरा पाटील, राज्य तसेच राज्याच्या बाहेरील अनेक कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गावाला शेवटची भेट सहा महिन्यापूर्वी
गणपतराव आंदळकर यांनी पुनवत या आपल्या गावी शेवटची भेट गेल्या मार्चमध्ये दिली होती. प्रकृती नाजूक असतानाही घरगुती कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी परिसरातील नागरिकांशी त्यांनी संवादही साधला होता. ही त्यांची पुनवतची शेवटची भेट ठरली.
सर्व व्यवहार बंद
आंदळकर यांच्या निधनामुळे सोमवारी पुनवतसह परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. पुनवत व शिराळे खुर्द येथील सर्व नागरिक आंदळकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी नियोजन करीत होते. त्यांच्या पुनवत येथील 'रुक्मिणी पांडुरंग छाया' या निवासस्थानी दिवसभर लोकांची रीघ लागली होती.गावाच्या नावाने मिळाली ओळख
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा जन्म पुनवत येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग गोविंद माने असे आहे. आंदळकर यांचे शिराळे खुर्द येथील आजोबा कृष्णा बाबाजी पाटील यांना मुलगा नव्हता, म्हणून त्यांनी आंदळकर यांना दत्तक घेतले. कृष्णा पाटील हे मूळचे पलूसजवळील आंधळी येथील. त्यामुळे कृष्णा पाटील (माने) यांना आंदळकर म्हणून ओळखले जात होते.

Web Title: The last message to Ganpatrao Andalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.