शहीद रामचंद्र माने यांना अखेरचा निरोप

By admin | Published: February 1, 2017 11:20 PM2017-02-01T23:20:37+5:302017-02-01T23:20:37+5:30

रामपूरवाडीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार : कुटुंबीयांना शोक अनावर; अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

The last message to Shaheed Ramchandra Mane | शहीद रामचंद्र माने यांना अखेरचा निरोप

शहीद रामचंद्र माने यांना अखेरचा निरोप

Next


कवठेमहांकाळ : रामपूरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शहीद जवान रामचंद्र शामराव माने बुधवारी अनंतात विलीन झाले. शोकाकुल वातावरणात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मोठा मुलगा संकेत व भाऊ अनिल यांनी माने यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. तत्पूर्वी सैन्यदलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद माने यांना मानवंदना दिली.
चार दिवसांपूर्वी जम्मूमधील कुपवाडा जिल्ह्यात माच्छिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात रामचंद्र माने कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. सोमवारी ही बातमी समजल्यापासूनच रामपूरवाडी परिसरात शोकाकूल वातावरण होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखाना कार्यस्थळावर भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर शहीद माने यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव घेऊन दाखल झाले. तेथे मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तेथून रुग्णवाहिकेतून रामपूरवाडीला नेत असताना कवठेमहांकाळ शहरात या वीर जवानाला सलाम करण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. नगरपंचायतीच्यावतीने मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. हिंगणगाव, करोली (टी) येथेही नागरिकांनी दुतर्फा अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. लष्करी ताफ्याबरोबर नागरिक रामपूरवाडीकडे रवाना होत होते.
सकाळी साडेनऊ वाजता माने यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. घरासमोर आई सुलाबाई, पत्नी सुनीता, मुले संकेत आणि रोहन, भाऊ अनिल, भानुदास यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकत होता.
बेळगावहून आलेले सैन्यदलाचे कमांडर रॉबिन इब्राहीम यांच्या पथकाने तसेच जिल्हा पोलिस दलाने शहीद माने यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी बेळगाव, कोल्हापूर तसेच जम्मूहून आलेले लष्करी अधिकारी व जवानांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा साधना कांबळे, गणपती सगरे, गजानन कोठावळे, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनकर पाटील, सरपंच मधुकर खोत, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, जतचे उपविभागीय अधिकारी नवनाथ वाकुडे, नारायण पवार, महेश खराडे, मिलिंद कोरे यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय जवान रामचंद्र माने यांच्या अंत्यदर्शनासाठी जमला होता. ‘शहीद रामचंद्र माने अमर रहे, वीर जवान तुझे सलाम’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सकाळी पावणेअकरा वाजता शहीद माने यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी चंदनाच्या लाकडांवर ठेवण्यात आले. कुटुंबीयांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा संकेत व भाऊ अनिल यांनी माने यांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि शहीद माने अनंतात विलीन झाले. (वार्ताहर)
पत्नीचा आक्रोश : मुले बावरली...
रामचंद्र यांची पत्नी सुनीता यांना सावरणे सर्वांनाच अशक्य झाले होते. त्यांचा आक्रोश हृदयाला पाझर फोडणारा होता. ‘मी आता कुणाकडे पाहून जगायचं? माझं सर्वस्व गेलं...’ म्हणून त्यांनी टाहो फोडला. मोठा मुलगा संकेत नऊ वर्षाचा, तर लहान रोहन सहा वर्षाचा आहे. या चिमुकल्या लेकरांना तर नेमके काय चालले आहे, हे समजत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. भाऊ अनिलचा आक्रोश तर मन सुन्न करणारा होता. पुतण्या आदर्श आणि पुतणी ऋतुजा यांनाही शोक अनावर झाला होता.
माने कुटुंबीयांची जबाबदारी शासनाची : सुभाष देशमुख
शहीद रामचंद्र माने यांच्या कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण जबाबदारी शासन घेईल, असे पालकमंत्री सुभाष देशमुख आणि सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले. आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही, माने कुटुंबाला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
माझ्या रामाला कुठं शोधू?
‘दुसऱ्याच्या बांधाला कामाला जाऊन, काबाडकष्ट करून तळहातावरच्या फोडाप्रमाणे तीन लेकरांना जपलं, वाढवलं, शिकवलं, भरती केलं. आता या माझ्या रामाला कुठं शोधू, सांगा साहेब. माझं लेकरू परत येईल का हो?, कुणीतरी आणा की माझ्या पोराला. सुटीवर आलाय का रामा...’, असा आई सुलाबाई यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. यावेळी आमदार सुमनताई पाटील त्यांना समजावत होत्या. मात्र आई सुलाबाई यांचा गहिवर पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले.

Web Title: The last message to Shaheed Ramchandra Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.