स्थायी सदस्य निवडीसाठी रात्रीची खलबते
By Admin | Published: September 1, 2016 12:47 AM2016-09-01T00:47:12+5:302016-09-01T00:57:20+5:30
महापालिका : नायकवडी, चव्हाण, बोळाज, बंडगर, हारगे यांची नावे आघाडीवर; आज महासभेत होणार निवड
सांगली : महापालिका स्थायी समितीच्या नव्या आठ सदस्यांची निवड गुरुवारी महासभेत होणार आहे. काँग्रेसकडून अतहर नायकवडी, शालन चव्हाण, राष्ट्रवादीतून प्रियंका बंडगर, संगीता हारगे, तर स्वाभिमानी आघाडीतून गटनेते शिवराज बोळाज, सुनीता पाटील यांची नावे आघाडीवर आहे. सदस्यांची नावे अंतिम करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सर्वच पक्षांत खलबते सुरू होती. त्यामुळे बंद लिफाफ्यातून कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत बुधवारी संपली. यात महापौर हारूण शिकलगार, दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे, आशा शिंदे, जरीना बागवान, शेडजी मोहिते, शांता जाधव, अश्विनी खंडागळे यांचा समावेश आहे. या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांच्या निवडीसाठी गुरुवारी महासभा होत आहे. सभेचा अजेंडा प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचे तीन व स्वाभिमानी आघाडीचे दोन सदस्य सभेत निवडले जाणार आहेत.
सत्ताधारी काँग्रेसमधील तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी अनेकांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी फिल्डिंग लावली आहे. दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे हे दोघेही पुन्हा इच्छुक आहेत. मिरजेतून अतहर नायकवडी व सांगलीतून गुंठेवारी समितीच्या सभापती शालन चव्हाण यांची नावे रात्री उशिरापर्यंत आघाडीवर होती. तिसऱ्या जागेसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते. एका गटाकडून दिलीप पाटील यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला होता. रात्री युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महापौर हारूण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार यांची बैठक सुरू होती. त्यानंतर काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील बुधवारी सांगलीत होते. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी जयंतरावांशी निवडीबाबत चर्चा केली. सूर्यवंशी यांनी इच्छुक नगरसेवकांची यादी पाटील यांना दिली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रियंका बंडगर, अंजना कुंडले, संगीता हारगे, प्रार्थना मदभावीकर यांच्यासह काही सदस्यांना गेल्या तीन वर्षात एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे याच नावांचा विचार राष्ट्रवादीत सुरू होता. बजाज यांच्यावर जयंतरावांनी निवडीची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनाच नावे सुचविण्याची सूचना केली असल्याचे सांगण्यात आले.
स्वाभिमानी आघाडीतील दोन नावांबाबत मोठी धुसफूस सुरू होती. गटनेते शिवराज बोळाज इच्छुक असल्याने त्यांना स्वाभिमानीतून विरोध आहे. गटनेतेपद असताना पुन्हा स्थायी समितीत संधी देऊ नये, अशीच नगरसेवकांची मागणी होती. सायंकाळी स्वाभिमानीचे नेते नगरसेवक गौतम पवार यांच्या उपस्थितीत महापालिकेत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळी, हेमंत खंडागळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. स्वाभिमानीतून रात्री उशिरापर्यंत बोळाज व सहयोगी सदस्या सुनीता पाटील यांची नावे आघाडीवर होती. बाळासाहेब गोंधळी यांनीही नेत्यांकडे आग्रह धरला होता. (प्रतिनिधी)
आघाडीची मान्यता : ‘स्वाभिमानी’ला दिलासा