सांगली पोलीस बंदोबस्ताचे नियोजन अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 05:25 PM2019-04-19T17:25:43+5:302019-04-19T17:27:15+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ एप्रिल रोजी होणाºया मतदान प्रक्रियेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन शुक्रवारी अंतिम टप्प्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ एप्रिल रोजी होणाºया मतदान प्रक्रियेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन शुक्रवारी अंतिम टप्प्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्ताचे वाटप केले जाणार आहे. सोमवारी सायंकाळी प्रत्येक मतदान केंद्राचा पोलीस ताबा घेतील.
निवडणुकीसाठी होणारी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार संपताच पोलिसांचा बंदोबस्त सुरू होणार आहे. रात्री कुठेही दंगा होऊ नये, यासाठी पोलीस गस्त घालणार आहेत. नाकेबंदीत वाढ केली जाणार आहे. बंदोबस्ताचे नियोजन शुक्रवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्याचे वाटप रविवारी केले जाणार आहे. पोलिसांना वाहने कमी पडणार असल्याने आरटीओ कार्यालयाने वाहने पुरविली आहेत. बंदोबस्ताशिवाय संवेदनशील मतदार संघात २४ तास गस्त घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मतदान केंद्र परिसरातील दुकाने बंद ठेवण्याची सूचना देण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. दुकाने सुरु राहिल्यास गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी दुकाने बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी मतदान असल्याने सोमवारीच बंदोबस्तास नियुक्त केलेल्या पोलिसांना मतदान केंद्राचा ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हापासून ते मंगळवारी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे सुरक्षित हलवेपर्यंत पोलिसांना थांबावे लागणार आहे. काही गावात यात्राही सुरु आहेत. मतदान काळात तेथील सर्व काही बंद ठेवले जाणार आहे.