'लाल परी'चा निरोप घेताना माणिकदादा गहिवरले, बाप्पापुढे हात जोडून रडायलाच लागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:20+5:302021-06-02T14:18:43+5:30
इस्लामपूर डेपोत चालक माणिकदादा यादव यांच्या ड्युटीचा आज अखेरचा दिवस होता. ३५-३६ वर्षे लाल परीची निष्ठेने सेवा केलेल्या माणिकदादांना गाडीतील गणेशाच्या प्रतिमेसमोर हात जोडताना गदगदून आले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एसटीच्या सेवेतून सोमवारी निवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांपैकी इस्लामपूर डेपोतील माणिकदादा यादव म्हणजे एक वेगळे रसायन. लाल परी त्यांच्या रक्तातच भिनलेली. आज शेवटचा दिस म्हणून माणिकदादा गहिवरले. गाडीत स्वत:च बसवलेल्या बाप्पाच्या प्रतिमेसमोर हात जोडून ढसाढसा रडले. लाडक्या ९१२ चा अखेरचा निरोप घेताना पाय जडावले.
वारणाकाठच्या येलूर, ऐतवडे खुर्द, कुंडलवाडी, तांदुळवाडी, कोरेगाव, नागाव, ढवळी आणि बागणी गावांतून सांगलीसाठी वर्षानुवर्षे धावणारी येलूर-सांगली (एमएच १४ बीटी ९१२) ही सकाळची गाडी प्रवाशांसाठी जीवाभावाची ठेव ठरली आहे. तिचे चालक माणिक यादव म्हणजे प्रवाशांचे सखेसोबती बनले होते. यादव आहेत म्हटल्यावर गाडी बागणीत सात वीसला पोहोचणार, हे नक्की असायचे.
ड्युटीला नोकरी न समजता व्रत मानून ३५-३६ वर्षे माणिकदादांनी स्टेअरिंगवरील पकड घट्ट राखली. स्वत:च्या सुख-दु:खाची झळ ड्युटीला बसू दिली नाही. माणिकदादांनी दांडी मारल्याने गाडी रद्द झाली नाही, असा प्रकार कधीच घडला नाही. अखेर वयोमानानेच या व्रतामध्ये खंड पाडला. सोमवारी त्यांच्या ड्युटीचा शेवटचा दिवस होता. वास्तविक कोरोनामुळे सव्वा वर्षे गाडी एकाच जागी थांबून आहे, पण आज ना उद्या जेव्हा ती धावू लागेल, तेव्हा स्टेअरिंगर माणिकदादा नसतील. धनाजी गावडे, इटकरेचे हणमंत पाटील, कोरेगावचे पाटील, बहादूरवाडीचे खोत, कुंडलवाडीचे पटेल भैय्या, मालेवाडीचे घाटगे, फार्णेवाडीचे प्रवीण देशमुख अशा अनेक प्रवाशांना माणिकदादा भेटतील, पण गाडीत सीटवर बसलेले सहप्रवासी म्हणून.
.................
आज माणिकदादा इस्लामपूरला डेपोत जाऊन आले. ९१२ ला घट्ट मिठी मारली. तिचा डिझेलमिश्रित गंध तनामनात भरून घेतला. म्हणाले, आता तुझी माझी परत भेट होणार नाही. गाडी सांगलीत प्लॅटफॉर्मला लागताना माणिकदादांचा विशिष्ट लयीतील हाॅर्न प्रवाशांना यानंतर कधीही ऐकू येणार नाही. माणिकदादांसारख्या निष्ठावान कर्मचाऱ्यांनीच एसटीचा प्राण कायम ठेवला आहे.