तीन वर्षात ३२ भोंदूबुवांचा भांडाफोड

By admin | Published: September 20, 2016 11:00 PM2016-09-20T23:00:03+5:302016-09-20T23:04:05+5:30

सांगली ‘अंनिस’ची कामगिरी : २६ जणांविरुद्ध दोषारोपपत्र; नांद्रेतील मौलवीला कारावास

In the last three years, 32 bombs have been destroyed | तीन वर्षात ३२ भोंदूबुवांचा भांडाफोड

तीन वर्षात ३२ भोंदूबुवांचा भांडाफोड

Next

सचिन लाड -- सांगली --विज्ञानाचे रूप घेतलेल्या अंधश्रद्धेला सुशिक्षित वर्गानेही वाहून घेतल्याचे चित्र आहे. अंधश्रद्धेचे समर्थन करण्याची प्रवृत्ती वाढल्याने जिल्ह्यात भोंदूबुवांचे जाळेही मोठ्या प्रमाणात पसरले आहे. हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची प्रभावीपणे मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या तीन वर्षात ३२ भोंदूबुवांचा भांडाफोड झाला आहे. या बुवांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले.
समाजातील प्रत्येक कुटुंब कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेले आहे. त्यांच्या असाहाय्यतेचा फायदा घेण्यासाठी भोंदूबुवांनी अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. ‘मूल होत नाही, धंद्यात बरकत करुन देतो, पैशाचा पाऊस पाडतो, करणी दूर करतो, लग्न ठरवून देतो, मुलगा होण्यासाठी औषध देतो’... अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्याची बतावणी करून बुवाबाजी पसरलेली आहे. पूर्वी गरीब लोकच अंधश्रद्धेला खत-पाणी घालतात, असा समज होता. पण अंधश्रद्धेला वाहून घेण्यात आजचा सुशिक्षित वर्गही पुढे आहे. समस्यांचा डोंगर घेऊन भोंदूबुवांसमोर माथा टेकविण्यासाठी पहाटेपासून रांगा लागलेल्या असतात. अंधश्रद्धेला खत-पाणी घालण्यात समाजाचा मोठा वाटा असल्याने, भोंदूबुवांची संख्याही वाढत आहे. राजकारण्यांपासून ते शासकीय अधिकारीही अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटलेले आहेत. श्रद्धा कशावर ठेवावी आणि कशावर नको, याचे भान प्रत्येकजण विसरत आहे. पैशाचा पाऊस पाडण्याची बतावणी करणाऱ्या भोंदूबुवावर विश्वास ठेवून नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकारही आपल्या हातून होत आहे.
अंधश्रद्धेच्या मागे लागलेल्या समाजाला रोखण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणाविरोधी प्रतिबंध कायदा करण्यासाठी लढा दिला. त्यांच्या लढ्याची दखल घेऊन शासनाने हा कायदा केला. या कायद्यामुळे भोंदूगिरीला बऱ्यापैकी चाप बसला आहे. या कायद्याचा आधार घेऊन सांगली ‘अंनिस’तर्फे भोंदूबुवांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या तीन वर्षात विविध समस्या सोडविण्याची बतावणी करुन भोंदूगिरीचा बाजार मांडलेल्या ३२ बुवांचा पर्दाफाश केला आहे. यातील २६ बुवांविरुद्ध जादूटोणाविरोधी प्रतिबंध कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहा बुवांनी, ‘येथून पुढे बुवाबाजी करणार नाही’, असा पोलिसांसमोर लेखीनामा दिला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले नाहीत. नांद्रे (ता. मिरज) येथील दर्ग्यातील मौलवीने व्यवसायात बरकत आणून देण्याचे आमिष दाखवून मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला होता. या मौलवीला न्यायालयाने साडेचार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सहा महिन्यापूर्वी याचा निकाल लागला आहे. जादूटोणाविरोधी कायद्यांर्गत शिक्षा झालेला जिल्ह्यातील हा पहिला निकाल आहे.
गेल्या तीन वर्षात ३२ भोंदूबुवांना पकडण्याची कारवाई झाली आहे. यातील काही भोंदूबुवा पडद्याआड राहून पुन्हा बुवाबाजी करुन लागले आहेत. सांगलीत अशा दोन बुवांना अंनिसने पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत. सध्या जे भोंदूबुवा पुन्हा अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करीत आहेत, त्यांचा अंनिसकडून शोध घेतला जात आहे. यासंदर्भात लोकांना काही माहिती असल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे

तक्रारदार वाढले : पोलिसांचे सहकार्य
जादूटोणाविरोधी प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविली जात असल्याने, भोंदूबुवांविरुद्ध लोक स्वत:हून अंनिसकडे तक्रार करण्यासाठी येत आहेत. गेल्या वर्षभरात सहा लोकांनी तक्रारी केल्या. अंनिसने या तक्रारींची चौकशी केली. ते स्वत: समस्या घेऊन भोंदूबुवाकडे गेले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

अंधश्रद्धेला एकप्रकारे ‘राजमान्यता’ मिळत आहे. कायद्याची मदत घेऊन आम्ही अंधश्रद्धेचे जाळे उद्ध्वस्त करीत आहोत. तक्रारदार स्वत:हून आता पुढे येऊ लागले आहेत. गेल्या तीन वर्षात राज्यात २०० भोंदूबुवांना पकडले आहे. ज्या भोंदूबुवांना पकडले आहे; ते पुन्हा हाच व्यवसाय करीत आहेत का?, याचा आम्ही शोध घेत आहोत.
- डॉ. प्रदीप पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली.


जागतिक अंधश्रद्धा
निर्मूलन दिन विशेष

Web Title: In the last three years, 32 bombs have been destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.