तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ‘झुकेगा कौन?’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:28 PM2022-01-28T14:28:12+5:302022-01-28T17:51:24+5:30
निवडणुकीबाबत अद्यापही महाविकास आघाडीबाबत नेमके चित्र स्पष्ट नाही
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिकेत गतवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून तडजोड न झाल्याने आघाडीत बिघाडी झाली आणि पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. यावेळी होणाऱ्या निवडणुकीबाबत अद्यापही महाविकास आघाडीबाबत नेमके चित्र स्पष्ट नाही. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्हीतील कार्यकर्ते इच्छुक आहेत. मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत ‘झुकेगा कौन?’ असा प्रश्न उपस्थित होत असून, याच प्रश्नाच्या उत्तरावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.
पाच वर्षांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू सुसाट होता. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी करून लढण्यासाठी अनेकदा काथ्याकूट झाला. मात्र, दोन्ही पक्षांत एकमत झाले नाही. अखेरच्या क्षणी चर्चा फिसकटली आणि भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली. या लढतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडली. काठावरच्या नगराध्यक्षपदासह पालिकेत भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादीची संधी थोडक्यात हुकल्याने पाच वर्षे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हे शल्य बोचत राहिले.
काँग्रेसकडूनदेखील तडजोड झाली तर महाविकास आघाडी अन्यथा स्वबळावर, अशी तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी झाली तर भाजपला सत्तेतून पायउतार करणे सोपे जाईल, असे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या त्रांगड्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी ‘झुकेगा कौन?’ हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
राष्ट्रवादी नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष सत्तेत यावा, अशी आशा आहे. त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सत्ताधारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. मात्र, विरोधी राष्ट्रवादीची नेमकी भूमिका स्पष्ट नाही. कवठेमहांकाळच्या निवडणुकीनंतर नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा दिला जाणार की महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविला जाणार याबाबत नेमके चित्र स्पष्ट नाही.