...अखेर महापौरांची उमेदवारी वैध- सांगली महापालिका निवडणूक - अर्जावर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:04 AM2018-07-13T00:04:43+5:302018-07-13T00:05:42+5:30
महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज वैध की अवैधची लागलेली चिंता, विरोधकांच्या आक्षेपानंतर उमेदवारांची उडालेली धावपळ, बाजू मांडण्यासाठी वकिलांनी घेतलेली धाव आणि कोणीच आक्षेप न
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज वैध की अवैधची लागलेली चिंता, विरोधकांच्या आक्षेपानंतर उमेदवारांची उडालेली धावपळ, बाजू मांडण्यासाठी वकिलांनी घेतलेली धाव आणि कोणीच आक्षेप न घेतल्याने उमेदवारांनी सोडलेला सुटकेचा नि:श्वास... असे वातावरण सहाही विभागीय निवडणूक कार्यालयात गुरुवारी पाहण्यास मिळाले. त्यात महापौर हारूण शिकलगार यांच्या उमेदवारीवर आक्षेप आल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अखेर सायंकाळी त्यांचा अर्ज वैध ठरल्याने काँग्रेस समर्थकांना दिलासा मिळाला.
उमेदवारी अर्ज छाननीसाठी सकाळपासूनच विभागीय निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती.
विभागीय कार्यालय एककडे १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १८६ अर्ज वैध ठरले, तर ८ अर्ज अवैध ठरले. सर्वाधिक तणाव या कार्यालयात होता. या कार्यालयाकडील प्रभाग १६ मधून महापौर हारूण शिकलगार यांच्या उमेदवारीवर आसिफ बावा यांनी आक्षेप घेतला होता. विभागीय कार्यालय दोनकडे १८२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १७५ अर्ज वैध ठरले, तर पाच अर्ज अवैध ठरले. यात उत्तम मोहिते यांचा अर्ज सूचक व अनुमोदक चुकल्याने अवैध ठरला. तुकाराम भिसे, माने व तिवडे यांनी अनामत रक्कमच भरलेली नव्हती, तर शैलजा कोरी यांचा अपक्ष अर्ज अवैध ठरला. पण त्यांचा पक्षाचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. विभागीय कार्यालय तीनकडे १५३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १२७ अर्ज वैध ठरले, तर २६ अर्ज अवैध ठरले. यात बहुतांश डमी अर्जांचा समावेश आहे.
प्रभाग १८ मधील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार ज्योती आदाटे यांचा अर्ज अवैध ठरला. त्यांनी अपक्ष व पक्षातर्फे असे दोन अर्ज दाखल केले होते. या दोन्ही अर्जांना सूचक व अनुमोदक एकच होते. पक्षाचा अर्ज अवैध ठरला असला तरी, अपक्ष म्हणून त्या रिंंगणात आहेत. तसेच भाजपचे उमेदवार सचिन चोपडे यांना एबी फॉर्मच्या घोळाचा फटका बसला. त्यांना क गटाचा एबी फॉर्म देण्यात आला होता, तर त्यांनी ड गटातून अर्ज दाखल केला होता. याच गटातून भाजपने नगरसेवक महेंद्र सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे क गटात भाजपचा उमेदवारच रिंंगणात असणार नाही.
सांगलीतील तीनही विभागीय कार्यालयात उमेदवार, सूचक अनुमोदकांसह समर्थकांनी गर्दी केली होती.
तिसऱ्या अपत्यावरून हरकतमहापौर हारुण शिकलगार यांच्या प्रभाग १६ मधून उमेदवारीला तिसºया अपत्याच्या कारणावरून आसिफ बावा यांनी ही हरकत घेतली होती. शिकलगार यांना २००८ मध्ये तिसरे अपत्य झाल्याची हरकत घेतली. याबाबत वसंतदादा शासकीय रुग्णालयाकडून त्यांच्या नावे मुलीचा जन्म झाल्याची महापालिकेकडे नोंद झाल्याचा दावा करीत कागदपत्रे सादर केली. त्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरवावा, अशी मागणी केली.
शिकलगार यांच्याबाजूने अॅड. राजू नरवाडकर आणि अॅड. मुमताज जमादार यांनी बाजू मांडली. त्यांनी शिकलगार यांच्याबाबत घेतलेले आक्षेप फेटाळून लावले. संबंधित महिलेशी शिकलगार यांचा काहीच संबंध नसल्याचे पुरावे सादर केले. निवडणूक अधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. बावा यांची मागणी फेटाळत, शिकलगार यांचा अर्ज त्यांनी पात्र ठरवला.
८२ अर्ज अवैध
पाच विभागीय कार्यालयांकडील छाननीत ८२ अर्ज अवैध ठरले, तर मिरजेतील पाच क्रमांकाच्या कार्यालयात छाननीचे काम सुरू होते. उर्वरित कार्यालयांकडे ९०५ अर्जांपैकी ८२३ अर्ज वैध ठरले.
मिरजेत भाजपच्या तीन उमेदवारांचा निर्णय प्रलंबित
मिरज : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीत मिरजेत सात प्रभागात १९५ उमेदवारांचे ३१० उमेदवारी अर्ज वैध ठरले. भाजपच्या संदीप आवटी व जयश्री कुरणे यांच्या उमेदवारीला घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी फेटाळून लावली. भाजपच्या विवेक कांबळे, संगीता खोत, गणेश माळी यांच्या उमेदवारीला घेतलेल्या आक्षेपाबाबत शुक्रवारी निर्णय होणार आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीसाठी मिरजेत दोन्ही केंद्रांवर उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. प्रतिस्पर्ध्याच्या उमेदवारीला हरकत घेण्यासाठी काही उमेदवारांनी वकिलांची फौज आणली होती.