Lata Mangeshkar: सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावरचे सांगलीतील लतादीदींचे बालपण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:15 AM2022-02-06T11:15:59+5:302022-02-06T11:16:26+5:30
प्रचंड उलथापालथ अनुभवत अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता.
अविनाश कोळी
सांगली : नाटकांचे संवाद, नाट्यगीतांचा बहर, शास्त्रीय संगीताच्या मैफीली, नाटकमंडळींची वर्दळ आणि सुवर्णकाळातून बरसलेली सधनता अनुभवत लतादिदींचे सांगलीतील बालपण बहरले. समृद्धीच्या पाऊलवाटांवरून चालताना वेदनांच्या काटेरी प्रवासाने घायाळ होण्याचा अनुभवही याच सांगलीत आला. सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावरचे हे बालपण अशा वेगवेगळ्या अनुभवांनी त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले ते कायमचेच.
सांगलीच्या एसटी स्टँडपासून हाकेच्या अंतरावर कोटणीस महाराजांच्या मठासमोरील चौकातच मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी प्रशस्त घर घेतले होते. या घराला तेरा खोल्या होत्या. मंगेशकर कुटुंबिय वरच्या मजल्यावर आणि तळमजल्यावर त्यांचे गणुमामा म्हणजे मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते रहायचे. याच घरामध्ये प्रतिष्ठित, विद्वान व गुणवंत मंडळींची कलाकारांची सतत ऊठबस असत. याच घरात लतादिदींसह आशा, उषा, मीना, हृदयनाथ या भावंडांचे बालपण गेले.
लतादिदींचा जन्म इंदौर येथे झाला असला तरी मास्टर दीनानाथांबरोबर मंगेशकर कुटुंबिय सांगलीत आले आणि स्थिरावले. याच ठिकाणी लता मंगेशकरांवर संगीत व नाट्य संस्कार झाले. शास्त्रीय संगीत आत्मसात करीत असताना अभिनयाच्या प्रांतामधूनही लतादिदींनी फेरफटका मारला तो सांगलीतूनच. याचठिकाणी घरात त्यांनी अनेक नाटकांचे खेळ म्हणून सराव केले आणि परिणामी त्यांना नाटकात अभिनयाची संधीही मिळाली.
१९३५ ते १९४0 हा त्यांचा सांगलीतील काळ संमिश्र अनुभवांचा राहिला. सांगलीतील शेवटचे हालाखीचे दिवस लता मंगेशकर यांना सर्वात वेदना देणारे होते. शेवटपर्यंत त्यांना या घटना सतावत राहिल्या. प्रचंड उलथापालथ अनुभवत अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता.