येडेनिपाणी येथे स्व.वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेला आजपासून सुुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:29 AM2021-03-01T04:29:27+5:302021-03-01T04:29:27+5:30
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळाच्या वतीने पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमाला कोरोना महामारीच्या ...
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळाच्या वतीने पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमाला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १ ते दि. ५ मार्चपर्यंत ऑनलाइन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे संस्थापक पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील यांनी दिली. ३२ वर्षे सुरू असणारा हा उपक्रम खंडित होऊ नये यासाठी यावर्षी ऑनलाइन, स्थानिक केबल व फेसबुक लाइव्ह अशा माध्यमातून होणार आहे.
जय किसान मंडळ हे सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक जाणीव जागृती, कृषी ग्रामविकास या ध्येयाने प्रेरित होऊन सुरू झालेले व्यासपीठ आहे. स्व. वसंतदादा यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून व्याख्यानमालेची सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जुनी व यशस्वी व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाते. या व्यासपीठावरून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नामवंत वक्ते यांनी प्रबोधन केले आहे. यावर्षी १ मार्चला ‘बदलते शिक्षण आणि रोजगाराची संधी...’ या विषयावर भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, २ रोजी ‘शिवशाही ते लोकशाही..’ या विषयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (नाशिक) यांचे, तर ३ रोजी श्रीमती छाया महादेव पिंगळे व भाग्यश्री फरांदे यांचेशी ‘अरे संसार.. संसार..’ या विषयावर इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे संवाद साधणार आहेत. ४ रोजी ‘लोकसंस्कृतीची आविष्कार रूपे..’ या विषयावर रामचंद्र देखणे (पुणे) यांचे, तर ५ रोजी सिद्धगिरी गुरुकुलम येथील कलाकारांचा सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रमाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.
कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून वसंतदादा सोसायटीच्या सभागृहामध्ये मर्यादित श्रोत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या व्याख्यानमालेचे संयोजन जय किसान मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक स्वामी, प्रा. स्वप्निल पाटील, कालिदास पाटील, शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.