‘हैदरखान’ बनली लातूरकरांची जीवनदायिनी

By admin | Published: April 19, 2016 12:11 AM2016-04-19T00:11:57+5:302016-04-19T00:55:53+5:30

ऐतिहासिक वारसा : सव्वाचारशे वर्षांहून जुनी विहीर दुष्काळी मदतीसाठी होणार सज्ज--लोकमत विशेष

Lathekar's life partner became 'Haiderkhan' | ‘हैदरखान’ बनली लातूरकरांची जीवनदायिनी

‘हैदरखान’ बनली लातूरकरांची जीवनदायिनी

Next

शरद जाधव-- सांगली --मिरजेतील रेल्वे स्थानकाला सव्वाशे वर्षांहून अधिक काळ पाणीपुरवठा करणाऱ्या ४३३ वर्षांच्या हैदरखान विहिरीने ऐतिहासिक वारशाची परंपरा आजही जपली आहे. लातूरला रेल्वेने पाणी पुरविण्याची योजना प्रत्यक्षात उतरल्यानंतर तर या विहिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या विहिरीमुळेच टँकरने पाणी पाठवण्यात सुलभता आली आहे. झाडाझुडपात हरवलेल्या या विहिरीची स्वच्छता पूर्ण झाल्याने सोमवारी तिचे भव्य रूप पाहायला मिळाले.
पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या लातूर शहराची तहान भागविण्याचे औदार्य सांगली-मिरजकरांनी दाखविले आणि राज्यभरातून या दातृत्वाचे कौतुक होऊ लागले. लातूरला दिवसाआड २५ लाख लिटर पाणी पुरविण्याची क्षमता असलेला प्रकल्पही आता अंतिम टप्प्यात आला आहे. या भागातील नैसर्गिक बाबींमुळे लातूरला पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला. यात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका सध्या बजावत आहे, ती हैदरखान विहीर. याच विहिरीतून वाघिणींमध्ये पाणी भरण्यासाठी जात असल्याने तिचे महत्त्व दिसून येते.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मिरजेत आदिलशहाचा सरदार हैदरखान याने १५८३ ला ही विहीर बांधली. त्यावेळी तिच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी होऊ लागला. याचदरम्यान या विहिरीतून मिरजेतील प्रसिध्द दर्गा परिसरात असलेल्या कारंजासाठी पाणी पुरविण्यात येत असल्याच्या ऐतिहासिक नोंदी सापडतात. कारंजापर्यंत पाणी नेण्यासाठी दगडी नळांचा वापर करण्यात येत असे. या विहिरीला हत्तीची मोट होती. आदिलशाहीच्या काळातील वास्तुकलेचा आदर्श नमुना म्हणूनही या विहिरीकडे पाहिले जाते. कालांतराने ही विहीर मिरज संस्थानच्या ताब्यात गेली. मिरजेत रेल्वे स्थानकाची उभारणी झाल्यानंतर १८८७ मध्ये ही विहीर रेल्वेने ताब्यात घेतली. कारण ती रेल्वेस्थानक परिसरातच आहे. तेव्हापासून मिरजेतून देशभर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये या विहिरीचेच पाणी भरले जाऊ लागले.
तब्बल ३२ लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या विहिरीची लांबी ५० फूट आणि रुंदी ७० फूट आहे. सगळे बांधकाम दगडी आहे. अनेक नैसर्गिक झरे असल्याने ती पूर्ण आटल्याचे ऐकिवात अथवा बघण्यात नाही.
अगदी १९७२ च्या भयानक दुष्काळातही या विहिरीचा तळ कोणी पाहिला नसल्याचे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. विहिरीला सुरुवातीला तीन कमानी होत्या मात्र, त्यातील एक पडल्याने सध्या दोन कमानी अस्तित्वात आहेत.


ऐतिहासिक ठेव्याची जपणूक
सध्या मिरज स्थानकातून रोज ५७ रेल्वेगाड्यांची ये-जा होत असते. या सर्व गाड्यांसाठी पाण्याची सोय याच विहिरीतून केली जात असे. मात्र रेल्वेने स्वत:ची साडेचार किलोमीटर जलवाहिनी टाकून पाणीयोजना राबविल्यानंतर या विहिरीकडे दुर्लक्ष झाले होते. तथापि काहीवेळा त्या योजनेत अडचण आल्यावर या विहिरीचाच आधार असतो. आता लातूरला रेल्वेच्या वाघिणींमधून पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्या जलवाहिनीद्वारे या विहिरीत पाणीसाठा करण्यात येणार आहे आणि ते पाणी उचलून दररोज वाघिणींमध्ये भरले जाणार आहे. त्यासाठी विहिरीची स्वच्छता करत साठलेले पाणी काढण्याचे काम सध्या सुरू आहे. ते मंगळवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. लातूरला पाणीपुरवठा करण्यात हैदरखान विहीर उपयोगी ठरत असल्याने, प्रशासनानेही या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऐतिहासिक कागदपत्रे : कुमठेकर संग्रहालयात
या विहिरीवर पारशी भाषेत लिहिलेला शिलालेख असून, अलीकडच्या काळात कठड्याचे काम करण्यात आले आहे. मिरजेतील इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहालयात या विहिरीची माहिती देणारी ऐतिहासिक कागदपत्रे, नकाशे उपलब्ध आहेत.

लातूरला रेल्वेने पाणी पुरविण्याची योजना प्रत्यक्षात उतरल्यानंतर मिरज रेल्वे जंक्शनला तब्बल सव्वाशे वर्षे पाणीपुरवठा करणाऱ्या हैदरखान विहिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या विहिरीची स्वच्छता मंगळवारी पूर्ण होणार असून, लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी ती सज्ज होणार आहे. पन्नास टँकरची पाणी एक्स्प्रेस आणि स्थानकावरील जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी रात्री किंवा बुधवारपासून लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी घेऊन ही रेल्वे धावणार आहे.

Web Title: Lathekar's life partner became 'Haiderkhan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.