लातूर पाणीप्रश्नावर सकारात्मकतेचा सूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2016 12:17 AM2016-04-08T00:17:05+5:302016-04-08T00:23:50+5:30

भाजप आक्रमक : राष्ट्रवादी, कॉँग्रेस नेत्यांकडूनही समर्थनाच्या भूमिकेमुळे विरोध करणारे एकाकी

Latur water stresses positive ... | लातूर पाणीप्रश्नावर सकारात्मकतेचा सूर...

लातूर पाणीप्रश्नावर सकारात्मकतेचा सूर...

Next

सांगली : मिरजेतून लातूरला पाणी देण्याच्या निर्णयाला विरोध करणारे कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आता पक्षाच्या अधिकृत सकारात्मक भूमिकेमुळे एकाकी पडले आहेत. कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अण्णा डांगे यांनी लातूरला पाणी देण्याच्या निर्णयाचे समर्थन केल्याने आता सर्वच पक्ष, संघटना एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांची अवस्था लातूरपेक्षा भयानक असल्याने लातूरला मिरजेतून पाणी नेणारी रेल्वे रोखण्याचा इशारा काँग्रेस नेते सिध्दार्थ जाधव व अनिल आमटवणे यांनी बुधवारी दिला होता. राष्ट्रवादी शहराध्यक्ष साजीद पठाण व नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांनीही यास विरोध केल्याने लातूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत होती, मात्र पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लातूरला पाणीपुरवठ्याच्या निर्णयास समर्थन दर्शविल्यामुळे स्थानिक नेत्यांची गोची झाली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळाकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेले दुर्लक्ष कॉँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना अजूनही खटकले आहे. तरीही लातूरबाबत आता सर्वपक्षीय सकारात्मकतेचे चित्र निर्माण झाले आहे.


रेल्वे अडवणे हे राष्ट्रवादीचे धोरण नाही : अण्णा डांगे
सांगली जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त असून अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे, असे असताना मिरजेहून लातूरच्या जनतेसाठी रेल्वेने पाणी नेणे यास आमचा विरोध आहे, अशी माहिती माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिली. डांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाण्याची रेल्वे अडविण्याच्या मैनुद्दीन बागवान यांच्या विचाराशी आम्ही सहमत नाही. दुष्काळग्रस्तांना शक्य तितकी मदत काही जोखीम पत्करून करण्याची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आहे. त्यांच्या विचाराला विसंगत अशी भूमिका बागवान घेत आहेत, हे योग्य नाही. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा मैनुद्दीन बागवान यांनी दौरा करावा. त्यांच्यासाठी तीव्र अंदोलन उभे करावे, त्यात आम्हीही सहभागी होवू.


रेल्वेला भाजप कार्यकर्ते संरक्षण देणार
मिरज : लातूरला पाणी न देण्याची दर्पोक्ती करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा भाजपने निषेध केला आहे. लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वेला भाजप कार्यकर्ते संरक्षण देऊन पाणी पाठवतील, असे भाजप जिल्हा सरचिटणीस ओंकार शुक्ल यांनी निवेदनात म्हटले आहे. दुष्काळग्रस्तांशी काही देणे-घेणे नसल्याने केवळ राजकारण करायचे आहे. सत्तेत असताना पाणी दिले नाही आणि आता सत्तेत नसतानाही पाणी अडविण्याच्या भूमिकेमुळे जनतेला त्यांचा पाण्याबाबतच कळवळा कळला. पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेण्यापूर्वी लातूरच्या काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांशी चर्चा करा. लातूरला जाऊन पाणी टंचाईची भीषण परिस्थिती त्यांनी पाहिल्यास विरोधाची हिंमत होणार नाही.

Web Title: Latur water stresses positive ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.