‘विधी’च्या विद्यार्थ्यांच्या पीएच.डी.च्या वाटा बंद; शिवाजी विद्यापीठात एकही जागा नसल्याने संताप
By अविनाश कोळी | Published: December 25, 2023 04:23 PM2023-12-25T16:23:22+5:302023-12-25T16:24:05+5:30
'तर मग एल.एल.एम. अभ्यासक्रम सुरू का ठेवले'
सांगली : नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत समारंभात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी हे जागतिक विद्यापीठासोबत स्पर्धा करतील, असे विधान करण्यात आले. परंतु, उच्च शिक्षण घेणाऱ्या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची पीएच. डी.ची वाटच विद्यापीठाने बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
पीएच. डी. प्रवेशाकरिता विद्यापीठाने परिपत्रक काढून अर्ज मागविले आहेत. प्रसिद्ध जाहिरातीनुसार एकूण ३४ अभ्यासक्रमांकरिता जवळपास १९८ जागा पीएच. डी.करिता आहेत. यामध्ये विधी अभ्यासक्रमाचा समावेश नाही. जर उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात जागाच उपलब्ध नाहीत तर मग एल. एल. एम. अभ्यासक्रम सुरू का ठेवले आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे मत रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी व्यक्त केले. वेटम म्हणाले की, हा अन्याय केवळ विद्यार्थ्यांवर नाही तर सहायक, सहयोगी प्राध्यापकांवरदेखील आहे. गोरगरीब, मागासवर्गीय संशोधक विद्यार्थी हे खासगी विद्यापीठात लाखो रुपये ‘फी’ भरून पीएच. डी.करिता प्रवेश घेऊ शकत नाहीत. सहायक, सहयोगी प्राध्यापकांना बढतीकरिता किमान दोन संशोधक विद्यार्थ्यांना गाईड म्हणून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विधी पीएच. डी.च्या जागा नसल्याने त्यांचेदेखील नुकसान होणार आहे.
अन्यत्र जाण्यासाठीही अडचणी
विद्यार्थी ज्या विद्यापीठात शिकत आहे, त्यालाच पीएच. डी.करिता प्राधान्य दिले जाते. इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना कमी जागा किंवा जागाच मिळत नाहीत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठांतर्गत येणारे संशोधक विद्यार्थी हे सर्वस्तरातून बाहेर फेकले जाणार आहेत. त्यांच्या वाटा बंद झाल्या आहेत.