चार गावांचा आराखडा धूळ खात

By admin | Published: October 19, 2015 11:09 PM2015-10-19T23:09:10+5:302015-10-20T00:21:47+5:30

मिरज पंचायत समिती : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; संस्थेचा अनागोंदी कारभार

The layout of the four villages ate the dust | चार गावांचा आराखडा धूळ खात

चार गावांचा आराखडा धूळ खात

Next

मिरज : केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राबविलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी निवडण्यात आलेल्या तालुक्यातील चार गावांचा कोट्यवधीच्या खर्चाचा कृती विकास आराखडा, सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेचा अनागोंदी कारभार व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनास सादर होण्याऐवजी तो मिरज पंचायत समितीमध्ये धूळ खात पडला आहे. त्यामुळे चार गावांना वेळेत निधी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे.
मिरज तालुक्यातील निर्मलग्राम योजनेत सहभाग न घेतलेल्या मालगाव, माधवनगर, बेडग व खटाव या चार गावांची या अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे. या गावांत स्वच्छतेच्यादृष्टीने मंजूर होणाऱ्या कोट्यवधीच्या निधीतून गटार बांधकाम, गाव शौचालययुक्त, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन ही कामे करण्यात येणार आहेत. याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले होते. या संस्थेने आराखडा पूर्ण केल्यानंतर तो पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरीसाठी शासनाकडे सादर होणार होता. गावातील प्रत्येक प्रभागात ग्रामसभा घेऊन, बांधावयाच्या शौचालयांची संख्या, गटारी, घनकचरा व सांडपाणी निर्मूलन या समस्यांचे सर्वेक्षण करून कच्चा आराखडा करण्याचे काम संस्थेने केले.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या साहाय्याने कामांचा व खर्चाचा आराखडा पूर्ण करण्याची गरज असताना, संस्थेने सर्वेक्षण केलेल्या कामांची मोजमापे, येणाऱ्या खर्चाची अंदाजे रक्कम याची कृती आराखड्यात नोंद न करता, तो अपूर्णावस्थेत पंचायत समितीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात सादर केला आहे. कृती आराखडा अपूर्ण असल्याने तो शासनाकडे सादर करता आला नाही. (वार्ताहर)

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष
स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यातील चार गावे स्वच्छ व सुंदर करण्यासाठीचा कोट्यवधी रुपये खर्चाचा कृती आराखडा अपूर्णावस्थेत पंचायत समितीत पडून आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेला हा अपूर्ण कृती आराखडा पूर्ण करण्यासाठी संबंधित संस्थेकडे पाठपुरावा करण्याची गरज असताना, जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.

Web Title: The layout of the four villages ate the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.