आळसंदच्या शेतकऱ्यांचे ‘ताकारी’च्या पाण्यासाठी बांधावर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:55+5:302021-03-26T04:26:55+5:30
आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथील शेतकऱ्यांनी ताकारी जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी बांधावर गुरुवारी उपोषण सुरू केले आहे. ताकारी पोटकालव्याच्या ...
आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथील शेतकऱ्यांनी ताकारी जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी बांधावर गुरुवारी उपोषण सुरू केले आहे. ताकारी पोटकालव्याच्या दरवाजातून काढण्यात आलेल्या पोटपाटाचे काम पूर्ण करून हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
आळसंद-कळंबी रस्त्यावर ताकारी जलसिंचन योजनेचा मुख्य कालवा आहे. दहा वर्षांपूर्वी त्याच्या पोटकालव्यामधून पोटपाट काढण्यात आला आहे. परंतु नंदकुमार सुर्वे, वसंत सुर्वे, सुखदेव सुर्वे या शेतकऱ्यांनी त्यांच्या हद्दीतून पुढे जाणाऱ्या पोटपाटाचे काम थांबवले आहे. त्यामुळे लिंगेश्वर मठाशेजारच्या शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. शेतीचे नुकसान होत आहे. शेतीसाठी ताकारी योजनेचे पाणी मिळत नाही, पण पाणीपट्टी मात्र वसूल केली जाते, हे कोणत्या नियमात बसते, असा सवाल शेतकऱ्यातून उपस्थित होत आहे.
शेतातील पिके वाळत आहेत. दहा वर्षांपासून पोटपाटासाठी पाटबंधारे कार्यालयाचा उंबरा झिजवत आहोत, पण अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गुरुवारी रमेश जाधव, धनाजी जाधव, शशिकांत सुर्वे, भाऊसाहेब जाधव हे शेतकरी उपोषणास बसले आहेत.
चौकट
१ एप्रिल रोजी आढावा बैठक
योजनेच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी १५ मार्च रोजी उपोषणाबाबत निवेदन दिले होते. गुरुवारी प्रत्यक्ष भेट न देता अधिकाऱ्यांनी मार्च एन्डमुळे वेळ नसल्याचे कारण देऊन पाणी वितरक सातपुते यांना उपोषणस्थळी पत्र घेऊन पाठवले. या पत्रात १ एप्रिल रोजी आढावा बैठक बोलविली असून, या बैठकीत तोडगा काढू, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी पत्र न घेता प्रत्यक्षात पोटपाटाचे काम सुरू केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले.