एलबीटीचा निर्णय चुकलाच
By admin | Published: October 2, 2014 09:39 PM2014-10-02T21:39:00+5:302014-10-02T22:28:56+5:30
जयंत पाटील : सांगलीतील सभेत जाहीर कबुली
सांगली : घाईगडबडीने जकात रद्द करून एलबीटी व्यापाऱ्यांवर लादण्याचा आघाडी सरकारचा निर्णय चुकलाच आहे. एलबीटीचा प्रश्न अर्धवट ठेवून व्यापारी, महापालिका कर्मचारी आणि नागरिकांचीही राज्य सरकारने फरफटच केली आहे. या प्रश्नाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार आपण भांडत होतो. परंतु, त्याकडे आमच्या सहकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही, अशी टीका माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी करून, आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हरिपूर येथे आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, जकात रद्द केल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. अनेक महापालिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. जकात रद्दचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले. पण, एलबीटी कराच्या जाचामध्ये त्यांची होरपळ होत आहे.
एलबीटीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याचा प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आग्रह धरला होता. परंतु, याकडे आमच्याच सहकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. सध्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील चुकीच्या निर्णयावर भाष्य करू शकतो. म्हणूनच एलबीटीच्या प्रश्नाबाबत आघाडी सरकारचा निर्णय चुकला आहे, असे माझे मत आहे, असे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचला आहे. पण, भाजप आणि शिवसेनेला ग्रामीण भागात जनाधार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी सुरेश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील, यांची भाषणे झाली. संजय बजाज, अभिजित हारगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संस्था चालविण्यास अंगात धमक लागते
ज्यांना स्वत:च्या संस्था व्यवस्थित चालवता आल्या नाहीत, ते दुसऱ्यांवर आरोप करीत सुटले आहेत. आपण कसे पराभूत झालो, याची कारणे शोधून ती दुरुस्त करण्याऐवजी माझ्यावरच पराभवाचे खापर फोडत आहेत. संस्था चालविण्यासाठीही अंगात धमक लागते, अशी टीका त्यांनी प्रतीक पाटील यांच्यांवर केली.
लोकसभेला नरेंद्र मोदींची गरज होती म्हणून जनतेने त्यांना मतदान केले. परंतु, राज्यात मोदी उमेदवार नसल्याने त्यांच्या नावाचा काहीही फायदा होणार नाही. जनमत चाचण्यांचे अंदाजही चुकणार आहेत. भ्रष्टाचारविषयी जाहिराती प्रसिध्द करण्यासाठी कोट्यवधी रूपये भाजपकडे कुठून आले?, असा सवालही केला.