एलबीटीप्रश्नी २६ ला सांगली बंद कृती समितीचा निर्णय : राजकीय भूमिका ठरणार
By admin | Published: May 15, 2014 12:43 AM2014-05-15T00:43:51+5:302014-05-15T00:45:07+5:30
सांगली : महापालिकेने एलबीटी नोंदणीसाठी व्यापार्यांवर मालमत्ता जप्तीचा बडगा उगारला आहे. याच्या निषेधार्थ कृती समितीच्यावतीने
सांगली : महापालिकेने एलबीटी नोंदणीसाठी व्यापार्यांवर मालमत्ता जप्तीचा बडगा उगारला आहे. याच्या निषेधार्थ कृती समितीच्यावतीने २६ मे रोजी सांगली बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीचे समीर शहा, विराज कोकणे यांनी दिली. यावेळी फॅमचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांच्या उपस्थितीत व्यापार्यांचा मेळावाही होणार असून, या मेळाव्यात विधानसभेसाठी व्यापार्यांची राजकीय भूमिकाही निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे येथे आज बुधवारी व्यापार्यांची राज्यव्यापी बैठक झाली. या बैठकीत सांगलीतील एलबीटीप्रश्नी महापालिकेच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. त्यासंदर्भात शहा म्हणाले की, सांगलीत महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी मनमानी सुरू केली आहे. आयुक्तांनी व्यापार्यांना जप्तीच्या नोटिसा बजाविल्या आहेत. वस्तुत: शासकीय स्तरावर एलबीटी हटविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना महापालिकेने मात्र व्यापार्यांचा छळ मांडला आहे. याबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली. सर्वच व्यापारी संघटनांनी महापालिकेच्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच येत्या २६ मे रोजी सांगली बंद ठेवण्यात आले आहे. बंददिवशी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नांदेड, लातूर या महापालिका क्षेत्रातील व्यापारी प्रतिनिधी सांगलीत येणार आहे. फॅमचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असून, त्यात विधानसभेसाठी राजकीय भूमिकाही निश्चित केली जाणार आहे. एलबीटीप्रश्नी व्यापार्यांचे असहकार आंदोलन सुरू राहणार असून, शासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. (प्रतिनिधी)