आघाडी फायनल; जागांचा निर्णय सांगलीत : अशोक चव्हाण-जयंत पाटील यांच्यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:11 AM2018-07-06T01:11:03+5:302018-07-06T01:11:47+5:30

Lead finale; The decision was made in the meeting: Discussion between Ashok Chavan and Jayant Patil | आघाडी फायनल; जागांचा निर्णय सांगलीत : अशोक चव्हाण-जयंत पाटील यांच्यात चर्चा

आघाडी फायनल; जागांचा निर्णय सांगलीत : अशोक चव्हाण-जयंत पाटील यांच्यात चर्चा

Next
ठळक मुद्देनागपुरात पार्लमेंटरी बोर्डाची बैठक स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे चेंडू

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या नागपूर येथे झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. आता दोन्ही पक्षांनी किती जागांवर लढायचे, यावर दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची शुक्रवारी रात्री बैठक झाली, पण जागा वाटपावर तोडगा निघू शकला नाही. सांगलीत स्थानिक पदाधिकाºयांनी एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय करावा, असे ठरले.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या हालचालीही गतिमान झाल्या होत्या. पण दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या पाहता वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या आदेशाकडे साºयांचेच लक्ष लागले होते. गुरुवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक नागपूर येथे होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पार्लमेंटरी बोर्डासमोर काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीचा अहवाल सादर केला.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश युवकचे अध्यक्ष आ. विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, माजी मंत्री सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील उपस्थित होते.
बैठकीत महापालिका क्षेत्रातील कॉँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसने स्वबळावर लढावे, असा सूरही काही नेत्यांनी आळवला होता. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला नकार देत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचे आदेश स्थानिक नेत्यांना दिले. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. आघाडी फायनल झाल्याने आता कोण किती जागा लढवायच्या? हा प्रश्न बाकी आहे. त्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण व जयंत पाटील यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा सांगलीतच सोडविला जावा, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. काँग्रेसकडील हक्काच्या जागा कायम ठेवाव्यात, असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला होता. त्याला पार्लमेंटरी बोर्डानेही सहमती दर्शविली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काच्या जागांचा निर्णय सुरूवातीला घ्यावा. काँग्रेसच्या ज्या जागांवर वाद नाही, त्या जागा आधी जाहीर कराव्यात, अशा सूचनाही पार्लमेंटरी बोर्डाने स्थानिक नेत्यांना केल्या. काँग्रेसअंतर्गत ज्या जागांवर इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि या जागांवर तोडगा काढण्यात स्थानिक नेत्यांना यश आले नाही, तर या जागांचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घेतील, असा निर्णय बैठकीत करण्यात आला. चव्हाण यांनीही अशा वादाच्या जागांचा अहवाल माझ्याकडे पाठवा, मी त्यावर निर्णय घेऊन कोणाला उमेदवारी द्यायची, हे ठरवू, असे स्पष्ट केले.

आघाडीतील जागा वाटपाबाबत शुक्रवारी रात्री अशोक चव्हाण व जयंत पाटील यांच्यासह सांगलीतील काँग्रेसच्या नेतेमंडळींची भोजनावेळी चर्चा झाली. पण दोन्ही बाजूंनी समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. सांगलीत दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून जागा वाटपावर चर्चा करावी, असा निर्णयही झाला. त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीत दोन्ही काँग्रेसची चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादी ३५ जागांवर ठाम
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला किमान ३५ जागा मिळाव्यात, अशी स्थानिक नेत्यांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे गतवेळचे संख्याबळ १९ असले तरी, धनपाल खोत, इद्रिस नायकवडी गट राष्ट्रवादीत आल्याने ताकद वाढल्याचा दावा केला जात आहे. सध्या राष्ट्रवादीकडे २७ नगरसेवक आहेत, तर आणखी आठ जागांवर मातब्बर उमेदवार असल्याने ३५ जागा मिळाल्या तरच काँग्रेससोबत आघाडी व्हावी, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवावा, असा सूर राष्ट्रवादीतून निघत आहे.

सांगलीत आज बैठक
दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जागा वाटपाचा चेंडू पुन्हा स्थानिक पातळीवर टोलविला आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात शुक्रवारी रात्री दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाºयांची सांगलीत बैठक होण्याची शक्यता आहे, असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.


 

Web Title: Lead finale; The decision was made in the meeting: Discussion between Ashok Chavan and Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.