मिरजेसाठी आघाडीच्या घटक पक्षांचाही आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 05:36 PM2019-09-26T17:36:42+5:302019-09-26T17:38:28+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक जागांचे वाटप चर्चेत अडकले आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात अजूनही जागांवरून संभ्रम दिसत आहे. आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दलाने मिरजेच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे ही जागा कोणाला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक जागांचे वाटप चर्चेत अडकले आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात अजूनही जागांवरून संभ्रम दिसत आहे. आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दलाने मिरजेच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे ही जागा कोणाला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज, खानापूर-आटपाडी आणि जत या तीन जागांना जनता दल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पसंती दर्शविली आहे. यात मिरजेच्या जागेसाठी जनता दल आग्रही असल्याचे दिसून येते. मिरज विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत कॉँग्रेसकडे असलेला मतदारसंघ आहे.
या मतदारसंघात कधी कॉँग्रेस, कधी जनता दल, कधी भाजप अशा वेगवेगळ््या पक्षातील लोकांना यश मिळाले. जनता दलाने याठिकाणी यापूर्वी यश मिळविल्यामुळे जनता दलाचा या जागेसाठी आग्रह राहणार आहे. सकॉँग्रेसकडे हा मतदारसंघ असला तरी, भाजपचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर सक्षम उमेदवाराचा शोध सुरूच आहे. अनुभवी, सक्षम उमेदवार नसल्याने घटक पक्षांनी ही जागा मिळावी म्हणून फिल्डिंग लावली आहे.
आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न चालविले आहेत. ही जागा राष्ट्रवादीला दिल्यास राष्ट्रवादीची हक्काची एखादी जागा कॉँग्रेसला द्यावी लागणार असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत मौन बाळगले आहे. गतवेळी स्वतंत्र लढलेल्या या दोन्ही कॉँग्रेसना आता भाजपविरोधात ताकद एकवटताना घटक पक्षांनाही जागा देऊन त्यांना बळ द्यावे लागणार आहे. त्यामुळे जिथे सक्षम उमेदवार नसतील अशा जागा घटक पक्षांना देण्याचा विचार दोन्ही कॉँग्रेस नेते करू शकतात.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खानापूर-आटपाडी मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे इच्छुक म्हणून समोर आले आहेत. जतमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनता दलाकडे इच्छुक आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांसाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. घटक पक्षांना जिल्ह्यातील केवळ एकच जागा देऊन अन्य जिल्ह्यातील अशा जागांचा शोध घेऊन घटक पक्षांची मागणी पूर्ण करण्याचाही कॉँग्रेस आघाडीत विचार सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चा आता गतीने सुरू आहेत. येत्या दोन दिवसात घटक पक्षांच्या जागांचा प्रश्न सोडवून उमेदवारांची यादी आघाडी जाहीर करू शकते.
मिरज विधानसभा मतदारसंघातून जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील दोनवेळा निवडून आले. पुणे पदवीधर मतदारसंघातूनही ते निवडून आले. त्यानंतर मिरज विधानसभा राखीव झाल्यानंतर जनता दलाला येथे प्रबळ उमेदवार मिळाला नव्हता. आता मिरजेची जागा जनता दल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार असल्याचा दावा प्रा. पाटील यांनी केला. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छुक धास्तावले आहेत.