प्रांताधिकाºयांची तलाठ्यास शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:50 AM2017-08-29T00:50:49+5:302017-08-29T00:50:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगावचे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी, वाळू वाहतूक करणारे ट्रक न पकडल्यामुळे कुंडलचे तलाठी एन. जी. आत्तार यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली आणि दोन दिवसात चार ट्रक पकडले नाहीत, तर निलंबित करेन, असा दम दिला. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, सांगली शाखेने आज सोमवारी ७/१२ संगणकीकरणाचे काम बंद ठेवले आणि प्रवीण साळुंखे यांच्यावर कारवाई न झाल्यास उद्या मंगळवारपासून निवडणूक कामकाज वगळता अन्य सर्व कामे बंद करण्याचा इशारा दिला आहे.
कडेगाव तालुक्यात येरळा नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. बहुतांशी वाळूचे ट्रक कुंडलमार्गे पलूस तालुक्यात जातात. त्यामुळे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी कुंडल तेथील तलाठी एन. जी. आत्तार यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांच्या निदर्शनास आले. यावरून संतप्त झालेल्या प्रांताधिकारी साळुंखे यांनी तलाठी एन. जी. आत्तार यांना काय करताय, वरिष्ठ अधिकारी वाळू ट्रक मागे आणि तुम्ही झोपा काढताय का? कुंडलमध्ये एक तरी वाळू वाहन पकडले का? असा जाब विचारत शिवीगाळ केली आणि दोन दिवसात चार ट्रक पकडले नाहीत, तर निलंबित करेन, असा दम भरला.
या घटनेचा निषेध करून प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांच्यावर कारवाई करा, अन्यथा तलाठी संघटनेने आज मंगळवारपासून निवडणूक कामकाज वगळता अन्य काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना देण्यात येणार आहे. यानंतर संघटना निर्णय घेणार असल्याचे समजते.
हप्ते घेताय आणि ट्रक पकडत नाही
प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी तलाठी एन. जी. आत्तार यांना हप्ते घेताय आणि ट्रक पकडत नाही, असा संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसात बेकायदा वाळूचे ट्रक पकडले नाहीत, तर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी तलाठी अत्तार यांना दिला. यावरून महसूल खात्यातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. याची चर्चा आज महसूल विभागात होती. याबाबत उद्या तलाठी संघटना काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.