विधानसभेच्या नरम-गरम चर्चेला इस्लामपुरात उधाण नेते सरसावले : मतदार नेमका कोणाचा याकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:24 AM2018-06-27T00:24:41+5:302018-06-27T00:25:51+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इस्लामपूर मतदारसंघात कोणत्याही पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे.
अशोक पाटील ।
इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इस्लामपूर मतदारसंघात कोणत्याही पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादीच्याच मदतीने संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे, तर विकास आघाडीतील महाडिक गटाने सवतासुभा मांडून मतदारसंघ पिंजून काढला आहे. याबाबत नरम-गरम चर्चेला उधाण आले आहे.
इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत विकास आघाडीतील नगराध्यक्ष बनलेल्या निशिकांत पाटील यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपासून पाटील यांनी इस्लामपूर, आष्टा या मुख्य शहरांसह ग्रामीण भागात संपर्क वाढवला आहे. ते नगराध्यक्ष होण्यामागे खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक यांची साथ होती. आता मात्र त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून जयंतरावांविरोधात विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विकास आघाडीतील राहुल महाडिक यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. यामुळे खोत यांच्यापुढे पेच निर्माण होणार आहे.
नगरपालिकेचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस इस्लामपुरात पहिल्यांदा आले होते. त्यानंतर विकास आघाडीच्या माध्यमातून निशिकांत पाटील भाजपवासी होऊन मुख्यमंत्र्यांच्या जवळ पोहोचले. आता सदाभाऊंनीही मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधून इस्लामपूर मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. भाजपचा उमेदवार म्हणून निशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे महाडिक गटात अस्वस्थता आहे.
राष्ट्रवादीतील वैभव शिंदे यांना पक्षात घेऊन भाजपने त्यांचे तरी समाधान केले का? यापूर्वी विलासराव शिंदे यांच्याशी निशिकांत पाटील यांची किती सलगी होती, मग आता ते त्यांचे सैनिक कसे बनले? विलासराव शिंदे यांचे आजही जयंत पाटील यांच्याशी राजकीय नाते घट्ट आहे. त्यामुळे भविष्यात कोण कोणाचा ‘कार्यक्रम’ करेल ते कळेलच.
- विजय पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी, वाळवा तालुका
विलासराव शिंदे यांच्या आमदारकीपासून इस्लामपूरचे नगराध्यक्ष निवडून आणण्यापर्यंत महाडिक गटाने प्रत्येकाला मदत केली आहे. आम्ही किती दिवस मदत करत राहणार? यावेळी आम्ही कोणालाही ताकद देणार नाही. वाळवा आणि शिराळा मतदारसंघातून आमची उमेदवारी निश्चित आहे.
- राहुल महाडिक, गटनेते वाळवा, पंचायत समिती