आरक्षण धास्तीने नेते अस्वस्थ

By admin | Published: July 1, 2016 11:27 PM2016-07-01T23:27:49+5:302016-07-01T23:36:52+5:30

इस्लामपूर नगरपरिषद : आज अठ्ठावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत

Leaders are uncomfortable with reservations | आरक्षण धास्तीने नेते अस्वस्थ

आरक्षण धास्तीने नेते अस्वस्थ

Next

अशोक पाटील -- इस्लामपूर शहरातील २८ प्रभागांतील आरक्षण सोडत २ रोजी राजारामबापू नाट्यगृहात होत आहे. खुल्या वर्गातील नगरसेवकांनी निवडणुकीच्या अगोदरच देव पाण्यात घातले आहेत. परंतु त्यांचे सर्व लक्ष आज होणाऱ्या आरक्षणाकडे लागले आहे. आपल्या हक्काच्या प्रभागाला काय आरक्षण पडते, याची धास्ती खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना लागून राहिली आहे.
नगराध्यक्ष निवडणूक जनतेतून होणार आहे. खुले पुरूष आरक्षण पडल्यास राष्ट्रवादीपुढे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही. खुले महिला आरक्षण पडल्यास माजी नगराध्यक्षा सौ. अरूणादेवी पाटील यांच्याशिवाय राष्ट्रवादीत सक्षम महिला नाही. दोघेही सध्या विद्यमान नगरसेवक आहेत.
नगराध्यक्षपद हे इतर वर्गासाठी पडले, तर त्यांच्या हक्काच्या प्रभागात काय आरक्षण पडते, याची धास्ती विजयभाऊ पाटील आणि खासदार एस. डी. पाटील यांच्या घराण्याला लागली आहे.
गेल्या ३५ वर्षाहून अधिक काळ पालिकेत नगरसेवक पदावर कार्यरत असलेले बी. ए. पाटील हे नेहमी आपल्या हक्काच्या प्रभागात सक्रिय असतात. ९५ च्या निवडणुकीत महिला आरक्षण असल्यामुळे पत्नी सौ. शारदा पाटील यांना नगरसेवक पदाची संधी देऊन निवडून आणले होते. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष पद हे खेचून आणले होते. त्यांचे चिरंजीव डॉ. संग्राम पाटील हेही गत निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. परंतु पिता-पुत्रात कुठे माशी शिंकली, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यामुळे बी. ए. पाटील निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. सध्या पिता-पुत्र पाटील हक्काच्या प्रभागात काय आरक्षण पडते याकडे लक्ष ठेवून आहेत.
एन. ए. ग्रुपमधील विद्यमान नगरसेवक खंडेराव जाधव, सौ. मनीषा पाटील यांचेही हक्काचे प्रभाग ठरलेले आहेत. एन. ए. गु्रपचे जयवंत पाटील यांनी यापूर्वी दुसऱ्या प्रभागात जाऊन निवडणूक लढविली होती. त्यामुळे खंडेराव जाधव आणि मनीषा पाटील इतर प्रभागातही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या दोघांना आरक्षणाशी काही देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे.
अशीच अवस्था विरोधी गटात आहे. भाजपचे विक्रमभाऊ पाटील, सौ. शुभांगी पाटील, कॉँग्रेसचे वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार यांनाही आरक्षणाची धास्ती लागून राहिली आहे. विरोधी गटात नगराध्यक्ष पदासाठी सक्षम नेतृत्व नाही. निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली तरी, विरोधकांच्यात आजही ताळमेळ नाही. त्यामुळेच सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये खुल्या वर्गातील इच्छुकांमध्ये रेलचेल आहे. त्यामुळे आज होणाऱ्या आरक्षणाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

अष्टपैलू : खेळाडू...
पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे वय झाले असले तरी सध्या ते निवडणुकीच्या रणांगणात मोठ्या उमेदीने उतरणार असल्याचे चित्र आहे. परंतु त्यांच्याच घरातील विद्यमान नगरसेवक शहाजी पाटील, शिवराज पाटील आणि राजवर्धन पाटील हेही निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत. यावर विजय पाटील काय तोडगा काढतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Leaders are uncomfortable with reservations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.