लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते पिछाडीवर, जिल्हा प्रशासन आघाडीवर; १०० टक्के विजयाचा आत्मविश्वास
By संतोष भिसे | Published: April 7, 2024 06:17 PM2024-04-07T18:17:23+5:302024-04-07T18:17:47+5:30
...पण निवडणूक आयोगाने मात्र प्रचाराच्या शर्यतीत आघाडी घेताना घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
सांगली : सांगली लोकसभेच्या प्रचाराचे रणांगण अद्याप तापले नसल्याने नेतेमंडळी वैयक्तिक भेटीगाठींवरच भर देत आहेत. सभासमारंभांना हजेरी, वाढदिवसाच्या शुभेच्छा असा हलका प्रचार करीत आहेत. पण निवडणूक आयोगाने मात्र प्रचाराच्या शर्यतीत आघाडी घेताना घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
मते मिळविण्यासाठी उमेदवारांकडून आश्वासने आणि आमिषे दाखवली जात असली, तरी प्रशासन मात्र प्रबोधनाच्या भूमिकेत आहे. विविध स्पर्धा, महिलांसाठी कार्यक्रम, रांगोळी व निबंध स्पर्धा, मतदानाचे आवाहन करणारे फलक याद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. मतदान हे अधिकाराबरोबरच कर्तव्यदेखील असल्याचे सांगत आहे. मतदान यंत्राची प्रात्यक्षिके दाखवून मतदारांशी जवळीक साधली जात आहे. यासाठी स्वीप मोहीम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत विटा येथे मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. तासगाव तालुक्यात रांगोळी स्पर्धा झाल्या. सांगलीत क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. पलूस येथेही रॅली काढण्यात आली.
मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो असे आवाहन करीत लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. आयोगाचे प्रतिनिधी वाड्या-वस्त्यांवर, आठवडी बाजारात, गर्दीच्या ठिकाणी, महाविद्यालयांत पोहोचून प्रचार करीत आहेत. पेट्रोल पंप, एसटी बसस्थानक, बसेस, टपाल कार्यालये, चावडी, मंगल कार्यालये, मोठे समारंभ आदी ठिकाणी पोस्टर, स्टीकर, ऑडिओद्वारे प्रचार सुरु आहे. उमेदवार जशी प्रचारपत्रे देतात, तशीच मतदारांकडून संकल्प पत्रे भरुन घेण्यात येत आहेत.
खुद्द जिल्हाधिकारीच प्रचारात
निवडणूक आयोगाच्या प्रचार मोहिमेत खुद्द जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी हे स्वत: उतरले आहेत. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.
विरोधकाचे आव्हान मोठे
निवडणूक आयोगाला टक्कर देणारा प्रमुख विरोधक म्हणून उन्हाळ्याचा विचार करावा लागत आहे. यंदा निवडणूक ऐन उन्हाळ्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. ७ मे रोजी मतदानावेळी तो आणखी किती वाढेल? याची चिंता प्रशासनाला आहे. अशा रणरणत्या उन्हात मतदारांना प्रचारासाठी घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. पण मतदानाच्या जास्तीत जास्त टक्केवारीद्वारे ही लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास प्रशासनाला आहे.