गाडगीळांकडे नेतृत्व : काका, खाडेंचे काय? महापालिका निवडणूक : चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेने भाजपमध्ये चर्चेला उधाण;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:37 AM2018-02-10T00:37:30+5:302018-02-10T00:40:36+5:30
सांगली : आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सूत्रे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे सोपविण्यात आली. शुक्रवारी बुथ प्रमुखांच्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तशी
सांगली : आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सूत्रे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे सोपविण्यात आली. शुक्रवारी बुथ प्रमुखांच्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तशी घोषणा केली. गाडगीळांच्या सोबतीला माजी आमदार दिनकर पाटील व माजी शहराध्यक्ष शेखर इनामदार या दोघांची नियुक्ती केली. पण भाजपचे खासदार संजयकाका पाटील व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या भूमिकेबाबत मात्र कोणतीच स्पष्टता करण्यात आली नाही.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रात भाजपचे दोन आमदार आहेत. खासदार संजयकाका पाटील यांचाही गट कार्यरत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व कोण करणार, याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, सुधीर गाडगीळ हेच नेतृत्व करतील, असे जाहीर केले होते. देशमुख व खा. पाटील यांचे राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे ही बाब भाजपमधील कार्यकर्त्यांनी फारशी गांभीर्याने घेतली नव्हती.
पण शुक्रवारी खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुधीर गाडगीळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया उंचाविल्या आहेत. बुथप्रमुखांची बैठक संपल्यानंतर व्यासपीठावरून उतरताना ते माघारी फिरले. त्यांनी ध्वनिक्षेपक ताब्यात घेत, महापालिकेची निवडणूक गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याची घोषणा केली. तसेच दिनकरतात्या पाटील व शेखर इनामदार हे त्यांचे सहाय्यक असतील, असेही जाहीर केले. चंद्रकांत पाटील यांनी जाता जाता ही घोषणा करण्यामागे नेमके कारण काय? याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिका क्षेत्रात खासदार संजयकाका पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. त्यात सुरेश खाडे हे तर मिरजेचे आमदार आहेत. पण दोघांचाही उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी केला नाही. त्यामुळे निवडणुकीत संजयकाका व सुरेश खाडे यांची भूमिका काय राहणार, तसेच निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये राजकीय मतभेद सुरू झाले की काय, अशी चर्चा रंगली आहे. सध्या भाजपमध्ये जुना-नवा वाद ऐरणीवर आला आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात आता लोकप्रतिनिधींतही वादाची ठिणगी पडली आहे.
राजकीय मतभेद : की दुर्लक्ष...
खा. संजयकाका पाटील यांचे सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. वीस वर्षांपूर्वी पाटील हे सांगली नगरपालिकेच्या राजकारणात कार्यरत होते. ते उपनगराध्यक्षही होते. त्यानंतर त्यांनी तासगाव गाठले, पण सांगलीतील त्यांचा गट शाबूतच होता. विकास महाआघाडीवेळी खा. पाटील यांंच्या विचारांचेही नगरसेवक पालिकेत होते. आताही त्यांना मानणारा एक गट भाजपअंतर्गत कार्यरत आहे. त्यामुळे खा. पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाजपला न परवडणारे आहे. सुरेश खाडे मिरजेचे प्रतिनिधीत्व करतात. तिथे तर पालिकेच्या २५ जागा आहेत. दोघांचेही सर्वपक्षीयांशी असलेले संबंध पाहता, त्यांना भाजपने निवडणुकीतून दुर्लक्षित केल्याची चर्चा आहे.
सांगलीत शुक्रवारी भाजप बुथप्रमुखांच्या शिबिरात चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, दिनकरतात्या पाटील, शेखर इनामदार उपस्थित होते.