सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे ठरलंय, नेते हतबल

By हणमंत पाटील | Published: May 2, 2024 06:28 PM2024-05-02T18:28:14+5:302024-05-02T18:30:49+5:30

तुमच्यावेळी हक्काने सांगा, पण आता काय बोलू नका

leaders, MLA, former MLAs are helpless before the workers in Sangli | सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे ठरलंय, नेते हतबल

सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे ठरलंय, नेते हतबल

हणमंत पाटील 

सांगली : तुमच्या विधानसभेला हक्काने सांगा, आम्ही जातीने तुमच्यासोबत आज पण आणि उद्या पण. तेवढे या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच उमेदवाराचा प्रचार करा, आघाडी व युतीधर्म पाळा, असे सांगून आम्हाला धर्मसंकटात टाकू नका. ‘आमचं ठरलंय,’ असे कार्यकर्ते ठामपणे नेत्यांना सांगत आहेत. त्यामुळे नेते, आजी-माजी आमदार कार्यकर्त्यांपुढे हतबल झाले आहेत.

सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. एका बाजूला उन्हाच्या झळा वाढत असतानाही सांगली लोकसभेतील प्रमुख पक्षाचे उमेदवार पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत आहेत. मात्र, जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांना मात्र काय करावे, हे सूचत नसल्याची परिस्थिती ग्राउंडवर आहे. आपल्याला पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करावे लागेल, अन्यथा विधानसभेचे तिकीट कट होण्याची भीती आहे.

मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. साहेब, यावेळी काही बोलू नका, विधानसभेला प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करतो, असे आश्वस्त करीत आहेत. कार्यकर्त्यांवर जास्त दबाव टाकला, तर ते दुखावले जातील, ही भीती आहे. अशीच परिस्थिती भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांत कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे.

लोकसभेला एकत्र, विधानसभेला विरोध..

राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. त्यामुळे एक गट महायुतीसोबत, तर दुसरा गट महाविकास आघाडीसोबत आहे. पक्ष फुटीनंतरची ही पहिलीच सार्वजनिक निवडणूक आहे. त्यामुळे खानापूर-आटपाडी व जत या विधानसभा मतदारसंघातील आमदार व विरोधक हे लोकसभेला एकत्र फिरताना दिसत आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र उलटे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राजकीय समीकरणे बदलणार..

सध्या सांगली लोकसभेतील सहापैकी तीन विधानसभांचे आमदार सुमन पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ), डॉ. विश्वजीत कदम (कडेगाव-पलूस) व विक्रम सावंत (जत) हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत फिरताना दिसत आहेत. तसेच, पालकमंत्री सुरेश खाडे (मिरज), सुधीर गाडगीळ (सांगली) व स्वर्गीय अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर (खानापूर-आटपाडी) हे तिघे महायुतीच्या उमेदवारासोबत फिरताना दिसत आहेत. मात्र, प्रत्यक्षात सहा विधानसभा आमदारांचे कार्यकर्ते मात्र विरोधी गटाला साथ देतानाचे चित्र ग्राउंडवर आहे. त्यामुळे लोकसभेला कोणता उमेदवार विजयी होणार, यावर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

अन्यथा तिकिट कापण्याची भीती..

सांगली लोकसभा निवडणुकीतील सहा विधानसभा मतदारसंघांतील नेते एका उमेदवारामागे आणि कार्यकर्ते दुसरीकडे असे वेगळे चित्र पहायला मिळत आहे. हायकमांड व पक्षश्रेष्ठी यांचे आदेश उमेदवाराला मताधिक्य देण्याचे आहेत. प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांपुढे काही चालत नसल्याची हतबलता नेते उघडपणे व्यक्त करीत आहेत. मात्र, आपल्या विधानसभा मतदारसंघात आपण मताधिक्य न दिल्यास आपले तिकीट कापण्याची भीतीही नेत्यांना वाटत आहे.

जिल्ह्यातील विधानसभेचे बलाबल

आमदार  - पक्ष - विधानसभा
सुधीर गाडगीळ - भाजप - सांगली
सुरेश खाडे - भाजप - मिरज
विक्रम सावंत - काँग्रेस - जत
डॉ. विश्वजित कदम - काँग्रेस - कडेगाव-पलूस
सुमन पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) - तासगाव-कवठेमहांकाळ
स्व. अनिल बाबर - शिवसेना (एकनाथ शिंदे) - खानापूर-आटपाडी

Web Title: leaders, MLA, former MLAs are helpless before the workers in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.