शिराळ्यामध्ये नेत्यांनी पेटवलं वाकुर्डेचं पाणी !
By admin | Published: October 6, 2014 10:58 PM2014-10-06T22:58:40+5:302014-10-06T23:43:39+5:30
विकासाचे मुद्देही ऐरणीवर : ग्रामीण भागातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
अशोक पाटील--इस्लामपूर --शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी वाकुर्डेचं पाणी चांगलंच पेटवलं आहे. विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी ग्रामीण भागातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाच्या सभास्थानी असले तरी, मतदार मात्र सर्वांच्याच सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत.
मानसिंगराव नाईक यांनी गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांचे चिन्ह टीव्ही होते, तर त्यांच्याविरोधात शिवाजीराव नाईक यांनी काँग्रेसच्या हाताचा पंजा चिन्हावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मानसिंगराव नाईक राष्ट्रवादीसोबत असले तरी, शिवाजीराव नाईक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले शिवाजीराव देशमुखांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हेही पक्षाच्या चिन्हावर नशीब अजमावत आहेत.
सर्वच उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेचा मुद्दा उचलून धरला आहे. याचे श्रेय घेण्यासाठी तिघेही सरसावले आहेत. भाजपच्या काळातच ही योजना सुरू झाली आणि भाजपच्याच काळात ही योजना पूर्ण होईल, असे आवाहन शिवाजीराव नाईक करीत आहेत. मानसिंगराव नाईकांनीही आपल्या कार्यकाळातच ही योजना मार्गी लागली असून योजना पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्या, अशी साद मतदारांना घातली आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणून कामे पूर्ण केल्याचा दावा सत्यजित देशमुख यांच्याकडून केला जात आहे. या तीनही उमेदवारांच्या सभा गाजत असून, मतदार त्यांच्या सभांना चांगलाच प्रतिसाद देत आहेत.
उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावला
शिवाजीराव नाईक यांनी वाळवा तालुक्यातील नेर्ले, वाघवाडी, येलूर या गावांलगत महामार्गावर उड्डाण पूल बांधण्यासाठी आंदोलन केले होते. त्याचाही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ते सभांमधून देत आहेत. शिवाय पेठ येथील वाघवाडीतील औद्योगिक वसाहतीला आपण विरोध केल्यानेच शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्याचेही सांगत आहेत.