नेत्यांकडून बंडखोरांच्या विनवण्या सुरू...
By Admin | Published: September 29, 2014 12:27 AM2014-09-29T00:27:18+5:302014-09-29T00:28:18+5:30
विधानसभा निवडणूक : महत्त्वाचे बंडखोर ठरणार डोकेदुखी, स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांकडून प्रयत्न
सांगली : आठ विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय याद्या तयार झाल्यानंतर आता प्रत्येक पक्षातील नेत्यांना बंडखोरांची चिंता सतावत आहे. डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून स्थानिक नेत्यांसह राज्यस्तरीय नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू झाली आहे. भविष्यात दुसरी संधी देण्याची आश्वासने आता बंडखोरांना मिळू लागली आहेत.
सांगली जिल्ह्यात सध्या बंडखोरांचे पीक आले आहे. कोणताही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. महायुती आणि आघाडी तुटल्यानंतर बंडखोरांची संख्या कमी झाली असली तरी, ती संपुष्टात आलेली नाही. अधिकृत उमेदवाराला डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या मोठ्या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी आता पक्षीय पातळीवर पळापळ सुरू झाली आहे. अधिकृत उमेदवारालाही यासाठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता बंडखोरांचे पीक आले आहे. यातील सर्वच बंडखोर दखलपात्र नाहीत. मोजक्याच बंडखोरांसाठी आता पक्षीय पातळीवरून मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सांगलीत दिनकर पाटील, शिवाजी डोंगरे, मिरजेतून सी. आर. सांगलीकर, इस्लामपुरातून बी. जी. पाटील, पलूस-कडेगावमधून संदीप राजोबा यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर तासगाव-कवठेमहांकाळमधील शिवसेनेचे दिनकर पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बंडखोर व नाराज इच्छुकांना आता शांत करण्याची गरज जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यातूनच मनधरणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अधिकृत उमेदवारांना याचा सर्वाधिक त्रास होणार असल्याने अशा उमेदवारांनी बंडखोरांना शांत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
काँग्रेसमधील नाराजांची समजूत काढण्यासाठी प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दूरध्वनीवरून बंडखोर व नाराजांशी संवाद साधला जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि अन्य नेत्यांनी बंडखोरांशी चर्चा सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ आॅक्टोबरपर्यंत आहे. मनधरणीसाठी नेते, पदाधिकारी आणि उमेदवारांकडे केवळ तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. इतक्या कमी कालावधित अशा लोकांना शांत करणे कसरतीचे ठरणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह, भाजप, सेनेलाही या गोष्टी कराव्या लागत आहेत. (प्रतिनिधी)
देवा! छाननीत अर्ज उडव!
उमेदवारी अर्जांची उद्या (सोमवारी) छाननी होणार आहे. बऱ्याचजणांना आपला अर्ज बाद तर होणार नाही ना, याबद्दल चिंता लागली आहे, तर अनेकांनी स्पर्धक उमेदवारांचा अर्ज बाद व्हावा म्हणून देवाला साकडे घातले आहे. बहुतांश पक्षांनी अधिकृत उमेदवाराला पर्याय म्हणून आणखी काहींचे अर्ज दाखल केले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद होवो, असे देवाला साकडे घातले आहे. सांगलीतील अशाच एका दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराने अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर मलाच संधी मिळेल, अशी खात्री व्यक्त केली.
४आर. आर. पाटील यांच्यावर टीका करून यापूर्वीच खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यात आता आणखी काही लोकांची भर पडण्याची चिन्हे आहेत. सांगलीत उमेदवारीसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक असलेले दिनकर पाटील यांचे नाव जेव्हा चर्चेत आले, तेव्हा आर. आर. यांनी त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकारच नाही, असे स्पष्ट केले. संजय पाटील यांचा उघडपणे प्रचार केल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागितलीच कशी, असा सवाल आबांनी उपस्थित केल्याची चर्चा आता राष्ट्रवादीच्या गोटात रंगली आहे. यापूर्वी अनेक बैठकांमधूनही आर. आर. पाटील यांनी दिनकर पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. दिनकर पाटील यांच्यासह समर्थकांमध्ये या गोष्टीवरून नाराजी दिसत आहे.