सर्वोदय साखर कारखान्यासाठी नेत्यांचा शड्डू
By Admin | Published: September 30, 2016 01:01 AM2016-09-30T01:01:00+5:302016-09-30T01:30:45+5:30
पंचवार्षिक निवडणुकीची तयारी : अस्तित्वासाठी लढणार जयंत पाटील - संभाजी पवारांचा गट
सांगली : दोन दिग्गज नेत्यांच्या संघर्षाची कहाणी लाभलेल्या कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. कारखान्यावर ताबा मिळविण्यासाठी निवडणुकीचे मैदान मारण्याच्या हेतूने आ. जयंत पाटील आणि माजी आमदार संभाजी पवार यांच्या गटाने आताच शड्डू ठोकला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये निवडणुकीसाठीची पेरणी हे गट करीत आहेत. सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया मेअखेर सुरू होणार होती. मात्र, दुष्काळामुळे या निवडणुका आॅक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचा फड रंगणार आहे. सर्वोदय कारखान्याच्या मालकी हक्कावरून गेली काही वर्षे जयंत पाटील आणि संभाजी पवार यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. कारखान्याचा ताबा सध्या राजारामबापू कारखान्याकडे आहे. या कारखान्याची उभारणी संभाजी पवार, शरद पाटील, व्यंकाप्पा पत्की यांच्यासह अन्य नेत्यांनी केली होती. स्थापनेनंतर पवारांच्या नेतृत्वाखालीच या कारखान्याचे काम सुरू होते. संभाजी पवारांचे पुत्र, माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याचा पूर्ण ताबा जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याकडे गेल्यानंतर पवारांनी जयंत पाटील यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला. आर्थिक देण्यांचा वाद न्यायालयात गेला. अजूनही हा संघर्ष सुरू आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना, जयंत पाटील यांनी मदत केली होती. नंतर राजारामबापू कारखान्याकडे याचा ताबा गेला. आर्थिक देवाण-घेवाण हा कळीचा मुद्दा ठरला. त्यातूनच राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ४८ गावे आहेत. यातील २४ हून अधिक गावे वाळवा तालुक्यात, तर उर्वरित मिरज तालुक्यात आहेत. कार्यक्षेत्रातील गावांमध्ये जयंत पाटील आणि संभाजी पवारांचे समान प्राबल्य आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या तयारीलाही दोन्ही गटांनी सुरुवात केली होती. पाच महिन्यांचा ब्रेक लागल्याने निवडणुकीच्या तयारीलाही विराम मिळाला होता. आता पुन्हा जोमाने दोन्ही गट कामाला लागले आहेत. सर्वोदय कारखान्याच्या निवडणुकीत काय होणार, हा जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. दोन दिग्गज नेत्यांच्या संघर्षाला या निवडणुकीच्या निमित्ताने बळ मिळणार असून, कारखान्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न होण्याची चिन्हे आहेत. तशी रणनीतीही तयार होत आहे. (प्रतिनिधी) २१ जागांसाठी निवडणूक वाळवा, सांगली, मिरज पूर्व आणि पश्चिम असे या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात ४८ गावांचा समावेश आहे. कारखान्याचे एकूण १६ हजार सभासद आहेत. यापूर्वी २३ जणांचे संचालक मंडळ अस्तित्वात होते. सहकार कायद्यातील बदलामुळे आता आगामी निवडणूक २१ जागांसाठी होणार आहे. लढाई प्रतिष्ठेची इस्लामपूरकर आणि सांगलीकरांच्या या लढाईत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. यापूर्वीही दोन्ही गटांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वादाचा डंका राज्यातही वाजला. त्यामुळे राज्यातील राजकीय गोटातही हा कारखाना चर्चेत आला होता. निवडणुकीच्या निमित्तानेही पुन्हा राजकीय पटलावर दोन्ही नेत्यांच्या संघर्षाची चर्चा रंगणार आहे.