विवाह समारंभात नेत्यांची रेलचेल
By admin | Published: May 3, 2016 11:25 PM2016-05-03T23:25:20+5:302016-05-04T00:47:23+5:30
उपस्थितीसाठी कसरत : कार्यकर्त्यांची मर्जी राखण्याचा आटोकाट प्रयत्न
अशोक पाटील --इस्लामपूर -दि. ३० एप्रिल व १ मे या दोन दिवशी विवाह समारंभांनी रेकॉर्ड ब्रेक केले. या समारंभास हजेरी लावण्यासाठी वाळवा व शिराळा तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली. आलेल्या निमंत्रण पत्रिकेची शहानिशा करुन, जवळचा आणि दूरचा कोण? याचा विचार करुनच बहुतांशी नेत्यांनी विवाह समारंभास उपस्थित राहणे पसंद केले. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तरीसुध्दा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा—शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्यापासून ते गावातील सरपंच पदापर्यंत असणाऱ्या सर्वच नेतेमंडळींनी लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.वाळवा, शिराळ्यात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचा गट मोठा आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना आपल्या लग्नसमारंभास आणण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचाच आग्रह असतो. स्वत: जयंत पाटील यांनीही कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरातील लग्नसमारंभ चुकू नये, म्हणून आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच उपस्थितीत लग्नसमारंभ पार पाडण्यासाठी काहींनी लग्नाची तारीख आणि मुहूर्ताच्या वेळेतही बदल केल्याची चर्चा आहे. तसेच काही कार्यकर्त्यांनी निमंत्रणपत्रिका देतानाच आपल्या वधू—वरांना सोबत घेऊन, त्यांच्याचहस्ते पत्रिका देऊन, तसेच त्यांचे आशीर्वाद घेऊन, काहीही झाले तरी लग्नाला उपस्थिती हवीच, असाही आग्रह केल्याचे समजते. जयंत पाटील यांनीही याची दखल घेत, ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवसातील लग्नसमारंभांना मॅरेथॉन भेटी देऊन रेकॉर्ड ब्रेक केले.
वाळवा तालुक्यातीलच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. पाटील यांच्यासह राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकाऱ्यांनाही, लग्नसमारंभास उपस्थिती लावताना तारेवरची कसरत करावी लागली.शिराळा तालुक्यातील नेत्यांचीही अवस्था अशीच आहे. येथे तीन गट सक्रिय असल्याने लग्नसमारंभास उपस्थिती लावण्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. माजी मंत्री, आमदार शिवाजीराव देशमुख यांची प्रकृती साथ देत नसली तरी, ते आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जमेल तेवढ्या लग्नसमारंभांना उपस्थित राहत आहेत.
परंतु त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख कार्यकर्त्यांच्या प्रत्येक समारंभास न चुकता उपस्थित राहत आहेत. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक हे पूर्वीपासूनच प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहण्यात अग्रेसर आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे.
आ. नाईक यांनी जमेल तेवढ्या लग्नसमारंभास उपस्थिती लावली. जेथे स्वत: जाणे शक्य नाही, तेथे त्यांनी आपल्या घरातील जि. प. सदस्य रणधीर नाईक व इतरांना उपस्थिती लावण्याचे नियोजन केले. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनीही जास्तीत जास्त विवाह समारंभांना आवर्जून उपस्थिती लावत, आपणही काही कमी नाही, असेच दाखवून दिले आहे.
वाहतुकीची कोंडी : मुहूर्त चुकले
३० एप्रिल व १ मे या दोन दिवशी लग्नसमारंभाचे बरेच मुहूर्त होते. घरासमोरील मंडपामधून ते मोठ्या कार्यालयांत लग्नाची धामधूम सुरु होती. इस्लामपूर व शिराळा शहरातील मंगल कार्यालयांत असलेल्या विवाह समारंभांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती. या वाहनांच्या कोंडीमुळे अनेकांना विवाह मुहूर्त गाठणे जमले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा—शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्यापासून ते गावातील सरपंच पदापर्यंत असणाऱ्या सर्वच नेत्यांनी लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.