ग्रामपंचायतीतून घडले नेतृत्व थेट विधानसभेपर्यंत पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:30+5:302021-01-03T04:27:30+5:30
सांगली : ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पायाभरणी असून येथे घडलेले नेतृत्व राजकारणात यशस्वीच झाल्याची उदाहरणे पहाण्यास मदत मिळत आहे. ...
सांगली : ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पायाभरणी असून येथे घडलेले नेतृत्व राजकारणात यशस्वीच झाल्याची उदाहरणे पहाण्यास मदत मिळत आहे. आमदार मोहनराव कदम, अनिल बाबर हे विधानसभेपर्यंत पोहोचले आहेत. सरपंचपदावर विराजमान झालेले चौघेजण जिल्हा परिषद अध्यक्ष तर सातजणांनी सभापतीपदापर्यंत झेप घेतली आहे.
सोनसळ ता. कडेगाव ग्रामपंचायतीचे १९६७ ते ७२ या कालावधीत सरपंचपद मोहनराव कदम यांनी भूषविले होते. ग्रामपंचायतीमध्ये आदर्श कारभारामुळे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचीही त्यांनी जबाबदारी संभाळली होती. पुढे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आहे.
गार्डी ता. खानापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनिल बाबर यांनी १९७२ च्या दरम्यान भूषविले होते. त्यानंतर जिल्हा परिषद विषय समितीचे सभापतीपदाची चांगल्यापध्दतीने जबाबदारी संभाळली होती. त्यांच्याकडील नेतृत्व गुण लक्षात घेवूनच संपतराव माने यांनी त्यांच्यावर खानापूर तालुक्यातील राजकारणाची जबाबदारी सोपविली होती. पुढे त्यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील विजय खेचून आणून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. मोहनराव कदम, अनिल बाबर यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच ते विधानसभेत प्रवेश केला. आता त्यांचे मंत्रीपदापर्यंत पाेहाेचणे हेच लक्ष असल्याचे दिसत आहे.
ग्रामपंचायतीपासून सुरुवात केलेले कासेगाव ता. वाळवा येथील देवराज पाटील, पांडोझरी ता. जत येथील अण्णासाहेब गडदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले आहेत.
चौकट
ही तर राजकीय पायाभरणी
ग्रामपंचायत सरपंचपदाची जबाबदारी संभाळल्यानंतर त्या व्यक्तीस ग्रामीण भागाच्या समस्यांची जाण असती. विकास कामे कशापध्दतीची केली पाहिजेत, याचा चांगला अभ्यास झालेला असतो. राजकारणातील बारकावेही त्यांना चांगल्यापध्दतीने कळत असल्यामुळे ग्रामपंचायत ही तर राजकीय पायाभरणीच आहे, असे मत सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग यांनी व्यक्त केले.
चौकट
असे घडले नेतृत्व
-बसवराज पाटील यांनी संख ग्रामपंचायतीचे सरपंच ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जत विधानसभेची निवडणूक लढविण्यापर्यंत राजकीय प्रवास झाला आहे. जत तालुक्यातील राजकारणामध्ये त्यांचा दबदबा आहे.
-कवठेपिरान ता. मिरज ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच ते जिल्हा परिषद सदस्यापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांनी गावात विकासाचे आदर्श मॉडेलही तयार केले आहे. त्यांची जि. प.चे अध्यक्षपदाची संधी थोडक्यात हुकले आहे.