प्रतिसरकारमधील आघाडीचे सेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 11:36 PM2022-02-05T23:36:54+5:302022-02-05T23:37:09+5:30

१९४४ ला एका मित्राच्या लग्नासाठी कोळेवाडीस जात असताना लाड यांच्यासह चौदा स्वातंत्र्य सैनिकांना कराडला अटक झाली.

Leading freedom fighter Captain Ramchandra Lad passes away at kundal | प्रतिसरकारमधील आघाडीचे सेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांचे निधन

प्रतिसरकारमधील आघाडीचे सेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांचे निधन

googlenewsNext

पलूस : क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारमधील आघाडीचे सेनानी, तुफान सेनेचे कॅप्टन, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामचंद्र ऊर्फ रामभाऊ श्रीपती लाड (वय १०१) यांचे शनिवारी सायंकाळी तासगाव येथे निधन झाले. शनिवारी सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पलूस येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढे तासगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सायंकाळी त्यांचे निधन झाले.

कॅप्टन रामचंद्र लाड यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेनेचे कॅप्टन म्हणून काम करताना हजारो सैनिक घडविले. १९४२ च्या नोव्हेंबरमध्ये एस्. एम. जोशी यांच्या शिबिरासाठी कुंडलच्या क्रांतिकारकांनी कॅप्टन रामचंद्र लाड यांना औंध येथे पाठविले. तेथून क्रांतीची प्रेरणा घेऊन ते कुंडल येथे परतले आणि गावात प्रशिक्षण केंद्र सुरू केले. शिबिरात लाठी, काठी, बंदूक चालविणे, गुंडापुंडाचा बंदोबस्त करणे, जाळपोळ, मोडतोड करून गनिमी पद्धतीने चळवळ वाढविणे यासारखे सर्व शिक्षण दिले जात असे. या ट्रेनिंग सेंटरचा प्रमुख म्हणून त्यांना ‘कॅप्टन’ ही उपाधी मिळाली होती.

१९४४ ला एका मित्राच्या लग्नासाठी कोळेवाडीस जात असताना लाड यांच्यासह चौदा स्वातंत्र्य सैनिकांना कराडला अटक झाली. त्यामुळे त्यांना साडेचार महिने सातारा, येरवडा येथे तुरुंगवास भाेगावा लागला. प्रतिसरकार निर्मितीनंतर त्यांच्या संरक्षणाची किंवा दिलेले निर्णय राबविण्याची सर्व जबाबदारी या तुफान सैनिकांवरच होती. जिल्ह्यातील मातब्बर दरोडेखोर व त्यांना साथ करणारे गावगुंड, टगे किंवा धनदांडगे यांच्या विरोधात क्रांतिवीरांनी उभारलेले बंड तुफानांच्या बलदंड शक्त्तीने यशस्वी केले आणि समाजकंटकांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. स्वातंत्र्यानंतर शेकापच्या प्रत्येक लढ्यात लाड अग्रभागी राहिले. मुंबईपासून बेळगावपर्यंत होणाऱ्या सर्व संघर्षात एक झंझावती तुफान अशी त्यांची ओळख राहिली. कुंडल येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात त्यांच्या पहाडी आवाजाने कुस्तीशाैकिन भारावून जात. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज, रविवारी सकाळी कुंडल येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढून अकरा वाजता कुंडल येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

Web Title: Leading freedom fighter Captain Ramchandra Lad passes away at kundal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.