आत्मविश्वासाच्या जोरावर उत्तुंग शिखरावर झेप
By admin | Published: April 22, 2016 11:30 PM2016-04-22T23:30:31+5:302016-04-23T00:54:36+5:30
सानिया हातखंबकर : मध्यमवर्गीय जीवन जगताना वाहकपदापासून वाहतूक निरीक्षकपदापर्यंत मारली मजल
सावर्डे : घरं आणि मूलं ही संकल्पना आता कोसो दूर गेली आहे. आज समाजात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर राहिल्या आहेत. विविध प्रकारचे शिक्षण घेऊन समाजात मानाचे स्थान मिळविणाऱ्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सानिया सुरेंद्र हातखंबकर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.)मध्ये वाहक ते वाहतूक निरीक्षक या पदापर्यंत मजल मारली आहे. आत्मविश्वास आणि जिगरबाजीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले आहे.
त्यांच्यावर त्यांच्या आई वासंती सीताराम जाधव यांचा मोठा पगडा आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी त्यांची आई हा त्यांचा गुरु असल्याचे त्या मानतात. त्यांची माहेरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती. आई-वडिलांच्या लाडात वाढलेल्या सानिया हातखंबकर यांनी सावर्डेत पहिले महिला ब्युटी पार्लर सुरु केले. चांगल्या ब्युटीशियन म्हणून काम सुरू केले. दहा वर्षे ब्युटी पार्लरचा व्यवसाय त्यांनी केला. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतानाच त्यांनी आयटीआयचे शिक्षणही पूर्ण केले. आयटीआयमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता. जिगरबाजपणा हा त्यांच्या अंगात भिनलेला होता. या बेडर आणि निर्भिड स्वभावामुळे त्यांना कोणाचीही भीती कधी वाटलीच नाही. समाजात वावरताना भीती हा शब्दच त्यांच्या मनात कधी आला नाही.
लग्नानंतर सहा महिन्यातच सासरी धामणी (ता. संगमेश्वर) येथे त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ३५० विक्रमी मतांनी निवडणुकीत विजयही मिळवला. चार वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. राजकारणातही काम कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.
२००९ साली एस. टी.मध्ये वाहक पदासाठी त्यांनी अर्ज केला. परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन त्या चिपळूण एस. टी. आगारामध्ये वाहक पदावर रुजू झाल्या. २००९ ते २०१४ सालापर्यंत त्यांनी वाहक म्हणून निष्कलंक सेवा बजावली. प्रवासी हा आपला मायबाप समजून त्यांनी प्रवाशांना चांगली सेवा दिली. कधी कठोर तर कधी नरम भूमिका घेत ‘देश तसा वेश’प्रमाणे त्यांनी आपले काम सुरु ठेवले. २०१५ साली त्यांनी वाहतूक निरीक्षक पदासाठी अर्ज भरला. त्या परीक्षेत यशही मिळवले. कोेकण विभागात एस.टी.मध्ये पहिली आणि एकमेव वाहतूक निरीक्षक होण्याचा मान सानिया हातखंबकर यांना जातो. त्या राज्यभरात एस. टी.च्या गाड्या कुठेही तपासू शकतात. त्यांनी आत्तापर्यंत एस. टी.तून फुकट प्रवास करणाऱ्यांना अद्दल घडवली असून, एस. टी.च्या तिजोरीत दंडाच्या रकमेची भर घातली आहे. प्रत्येकाशी आपुलकीने वागणाऱ्या अधिकारी म्हणून त्या एस. टी.मध्ये परिचित आहेत.
एस. टी.मध्ये कार्यरत असताना सामाजिक कार्यातही त्या अग्रणी असतात. महिला चळवळीमध्ये त्या अग्रभागी असतात. यासाठी त्यांना पती प्रा. सुरेंद्र हातखंबकर यांचे प्रोत्साहन लाभते. एस. टी. बसमधून प्रवास करताना प्रवाशांबरोबर हितगुज साधतानाच मुलींना मार्गदर्शनही करतात. त्यांची कारकीर्द ही इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशी आहे. (वार्ताहर)
मध्यमवर्गीय कुटुंबात वाढत असताना आईला आपली गुरू मानून एस. टी. महामंडळाच्या वाहतूक निरीक्षकपदापर्यंत पोहचण्याचा मान सानिया हातखंबकर यांनी मिळवला आहे. कोकण विभागात पहिल्या वाहतूक निरीक्षक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.