जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे
By admin | Published: August 10, 2016 11:43 PM2016-08-10T23:43:08+5:302016-08-11T00:51:43+5:30
भिंतींना पडल्या भेगा : बेळंकी येथील गायकवाडवाडी शाळेची स्थिती, प्रशासनाचे दुर्लक्ष
मोहन मगदूम== लिंगनूर -बेळंकी (ता. मिरज) येथील गायकवाडवाडी जिल्हा परिषद शाळा पन्नास ते साठ वर्षांपूर्वी बांधलेली आहे. याच्या भिंती जुन्या झाल्यामुळे त्या कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीतच विद्यार्थी शाळेत बसत असल्याने पालक वर्गातून भीती व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यात जिल्हा परिषद शाळा नंबर एक बेळंकीमधील शाळेचे छत कोसळल्याची घटना ताजी असतानाच, बेळंकीमधीलच गायकवाडवाडीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेळंकी येथील जि. प.ची गायकवाडवाडी शाळा गावापासून तीन कि.मी अंतरावर आहे. या शाळेत सध्या गायकवाडवाडी, मेटकरी मळा परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे पहिली ते चौथी असे वर्ग असून स्लॅबचीही इमारत येथे आहे. बाकीचे तीन वर्ग कौलारू इमारतीमध्येच भरतात. पण ही इमारत जुनी झाली असल्याने धोकादायक बनली आहे. शाळेतील इमारती गेल्या दोन-तीन वर्षापासून नादुरुस्त बनल्या आहेत.
या शाळांपासून काही अंतरावरून रेल्वेलाईन गेली आहे. यामुळे रेल्वे जाताना भिंतीला हादरे बसतात. त्यामुळेही भिंतींना भेगा गेल्या आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये चारी कोपऱ्यांच्या भिंतीमधून पाणी गळत होते. त्यामुळे भिंती कमकुवत झाल्या आहेत. शाळा जुनी झाली असल्याने कौले फुटली आहेत. त्यामुळे सध्या पावसाचे पाणी शाळेत मोठ्या प्रमाणात गळत आहे. अशा ओल्या जागेतच विद्यार्थी शाळेत बसत होते. शाळेतील खोल्यांच्या बांधकामासाठी शाळेने बांधकाम निर्लेखनाचे प्रस्ताव यापूर्वी दोन वेळा बांधकाम विभागाकडे व पंचायत समिती विभागाकडे दिलेले आहेत. प्रस्तावाचा वारंवार पाठपुरावा करूनदेखील बांधकाम व शिक्षक खात्याचा एकही अधिकारी शाळेकडे फिरकलेला नाही किंवा लेखी कोणतेही उत्तर दिले नसल्याचे मुख्याध्यापक श्रीकांत माजरे म्हणाले. वेळीवेळी प्रशासनाला याबाबत कळवूनसुद्धा संबंधित अधिकारी दखल घेत नाहीत. ही इमारत पडली किंवा आणखी कोणती दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा सवालही पालक वर्गातून होत आहे.