आटपाडीत १४ वर्षांत १६ पोलिस निरीक्षक!

By admin | Published: June 7, 2017 12:24 AM2017-06-07T00:24:19+5:302017-06-07T00:24:19+5:30

आटपाडीत १४ वर्षांत १६ पोलिस निरीक्षक!

At least 16 police inspectors in 14 years! | आटपाडीत १४ वर्षांत १६ पोलिस निरीक्षक!

आटपाडीत १४ वर्षांत १६ पोलिस निरीक्षक!

Next


अविनाश बाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : प्रभू रामचंद्र १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आले होते म्हणतात. पण सध्या आटपाडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा येथे गेल्या १४ वर्षांपासून वनवास सुरु आहे. मागील १४ वर्षात फक्त एक अधिकारी वगळता, एकही पोलिस निरीक्षक येथे टिकला नाही. मुदतीपूर्वीच निरीक्षकांच्या बदल्या होण्यामागचे गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आटपाडी पोलिस ठाण्याचे जिल्ह्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. त्यामुळे या पोलिस ठाण्यास जिल्हा पोलिसप्रमुख अथवा तत्सम दर्जाचे अधिकारी क्वचितच भेट देतात. त्यामुळे अनेकदा येथील सगळा आलबेल कारभार सुरु असतो. आटपाडी तालुका म्हणजे दुष्काळी तालुका. त्यात स्थलांतरितांची संख्या अधिक. त्यामुळे तालुका कायम शांत असतो. अगदी टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठीची आंदोलनेही इथे कायम शांततेतच पार पडली. कधीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली नाही.
अशा या दुष्काळी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्ष मात्र तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षातून मारामाऱ्या घडत आहेत. विरोधकांची जिरवण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असल्याचा वारंवार आरोप केला जात आहे. त्यातून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. असे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रसिध्द होत चाललेल्या या पोलिस ठाण्यात आता अधिकाऱ्यांची सारखी बदली होण्याबाबतही चर्चा होऊ लागली आहे. मुदतीआधीच बदली झाल्यामुळे थेट अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेऊन पुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यावर कब्जा मिळविल्याचेही उदाहरण आहे. त्यामुळे बदली होईल या भीतीपोटी जर अधिकारी काम करु लागले, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याचा अर्थ सर्वच अधिकारी सक्षम होते असाही नाही आणि गेल्या १४ वर्षात मुदतीपूर्वीच बदली झालेले सर्वच अधिकारी अकार्यक्षम होते, असेही म्हणता येणार नाही. तरीही येथील अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदल्या होत आहेत. एकूणच या बदली प्रकरणामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी चुकीचा संदेश जाणार नाही, याची खबरदारी इथल्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बदली करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.
एकही अधिकारी सलग दोन वर्षे नाही!
पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांचा अपवाद वगळता, गेल्या १४ वर्षांत एकाही पोलिस निरीक्षकांना सलग दोन वर्षे येथे सेवा करता आलेली नाही. त्यामुळे बदलीची टांगती तलवार डोक्यावर असणारे अधिकारी लोकांना न्याय कसे देणार? हा प्रश्नच आहे. पोलिस निरीक्षक रसिकलाल गुजर यांनी त्यांच्या बदलीविरोधात ‘मॅट’मध्ये जाऊन न्याय मागण्याचे धाडस दाखविले. परवा साडेदहा महिन्यातच बदली झालेले पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी सध्या आजारी रजेवर गेले आहेत. तेही ‘मॅट’मध्ये जाऊन बदलीविरोधात आवाज उठवणार असल्याची चर्चा आहे.
पोलिस निरीक्षकांचा कार्यकाल
चंद्रकांत देशमुख २६ मार्च २००४ ते ६ आॅक्टोबर २००५, दयाराम शिंदे ६ आॅक्टोबर २००५ ते २६ जून २००६, लक्ष्मणराव जाधव २६ जून २००६ ते ८ मे २००७, चंद्रकांत देशमुख ९ मे २००७ ते २१ एप्रिल २००८, किसन गवळी २१ एप्रिल २००८ ते ३० जानेवारी २००९, राजाराम शिंदे ३० जानेवारी २००९ ते १६ एप्रिल २०१०, रसिकलाल गुजर १६ एप्रिल २०१० ते २८ आॅक्टोबर २०११, संजय पवार २८ आॅक्टोबर २०११ ते ८ मार्च २०१२, रसिकलाल गुजर ८ मार्च २०१२ ते ३१ आॅक्टोबर २०१२, सुनील गिड्डे १ नोव्हेंबर २०१२ ते १३ डिसेंबर २०१२, एन. जी. कुलकर्णी १४ डिसेंबर २०१२ ते १९ फेब्रुवारी २०१४, सुनील गिड्डे १९ फेब्रुवारी २०१४ ते ८ जून २०१४, सदाशिव शेलार ८ जून २०१४ ते ३ जून २०१६, सुधाकर देढे १६ जून २०१६ ते १८ जुलै २०१६, के. एस. पुजारी १८ जुलै २०१६ ते २ जून २०१७.

Web Title: At least 16 police inspectors in 14 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.