नोकरी सोडेन, पण चूक करणार नाही!
By admin | Published: March 30, 2017 11:34 PM2017-03-30T23:34:20+5:302017-03-30T23:34:20+5:30
महापालिका सभेत आयुक्त भावनिक : शेखर माने-खेबूडकर यांच्यात वाद; एलबीटीचा मुद्दा बनला कळीचा
सांगली : महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना लक्ष्य केले. माने यांच्या आरोपामुळे व्यथित झालेल्या आयुक्तांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘खेबूडकर नको असतील तर तसे स्पष्ट सांगा, मी तुमच्या ठरावाचीही वाट पाहणार नाही. महापालिकेत मी कामासाठी आलो आहे, कामे अडविण्यासाठी नाही. प्रसंगी नोकरी सोडेन, पण वाईट काम करणार नाही’, अशा शब्दात आयुक्तांनी नगरसेवकांना फटकारले.
निमित्त होते, एलबीटी वसुलीच्या कारवाईचे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे यांनी आठवड्यापूर्वी ६३६ कोटींचे अंदाजपत्रक महासभेकडे सादर केले. त्यावर अभ्यास करण्यासाठी महासभा तहकूब करण्यात आली होती. गुरुवारी ही तहकूब सभा महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत एलबीटी वसुलीचा मुद्दा नगरसेवक शेखर माने यांनी मांडला. एलबीटीची वसुली का थांबविली आहे, कुठल्या नगरसेवकाचा हस्तक्षेप आहे, असा सवाल करीत माने यांनी आयुक्तांना टार्गेट केले. सांगलीत काम केलेले बहुतांश आयुक्त आज उच्चपदावर काम करीत आहेत. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्हीही या महापालिकेतून काही तरी शिकले पाहिजे. पण ही संस्थाच मोडून पडणार असेल, तर तुमचे शिकणे व्यर्थ ठरेल. तुम्ही आयुक्त म्हणून ‘एन्जॉय’ करण्यासाठी आला आहात का? तसे असेल तर आम्ही तुमच्याकडून काहीच अपेक्षा धरणार नाही. आयुक्तांच्या बंगल्यावर रात्रीच्यावेळी कोण, कोण येते, अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर कोण पैसे घेऊन जाते, तिथे काय काय चालते, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे, अशा शब्दात त्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला.
माने यांनी आयुक्तांना लक्ष्य करताच काँग्रेसचे सुरेश आवटी, संतोष पाटील, राजेश नाईक, राष्ट्रवादीचे विष्णू माने, शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान हे सदस्य खेबूडकरांच्या मदतीला धावले. अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सभा बोलाविली आहे, वैयक्तिक टीका-टिपणीसाठी नव्हे, अशा शब्दात माने यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. प्रसिद्धीसाठी सभागृहात नको ते आरोप होणार असतील, तर महापौरांनी ते चालू देऊ नये, असे आवटी यांनी सांगितले. तसेच धनपाल खोत यांनी, सभागृह म्हणजे तमाशाचे थिएटर नाही, अशा शब्दात उत्तर दिले. उपमहापौर गटाविरूद्ध काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले असतानाच, गटनेते किशोर जामदार यांनी मध्यस्थी करीत, सदस्यांनी केवळ अंदाजपत्रकावर चर्चा करावी, कुणाचा अपमान होईल, असे वर्तन सभागृहात करू नये. हा सभागृहाचा इतिहास नाही, असे सांगत समजूत काढली.
माने यांच्या आरोपामुळे आयुक्त खेबूडकर व्यथित झाले. त्यांनी ध्वनिक्षेपक हातात घेत त्यावर खुलासा केला. ते म्हणाले की, मी गेली २४ वर्षे शासकीय सेवेत कार्यरत आहे. त्यातील दहा वर्षे सांगलीत गेली आहेत. आजवर मी दिलेल्या शब्दात कधीच बदल केलेला नाही. नेहमी लोकांच्या हिताचेच काम केले आहे. खेबूडकर नको असतील तर तसे सांगा, मी तुमच्या ठरावाची वाट पाहणार नाही. खेबूडकर काय करतात, यासाठी काहीजणांनी माझ्या बंगल्याबाहेर पाळत ठेवली होती. पण मी कुठलेही वाईट काम करणार नाही. प्रसंगी नोकरी सोडून घरी बसेन. अखेर महापौर शिकलगार यांनी आयुक्तांना थांबवत, या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)