पाणी मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी!
By admin | Published: July 16, 2014 11:34 PM2014-07-16T23:34:13+5:302014-07-16T23:39:48+5:30
डोंगरवाडीकर आक्रमक : इच्छुकाने लावलेला फलक काढण्यास भाग पाडले
सोनी : डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, संघर्ष समितीने निवडणुकीवर बहिष्काराबरोबर गावामध्ये कोणत्याही नेत्याला डिजिटल फलक लावण्यास बंदी केली असून, यापुढे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यास गावामध्ये प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी आज (बुधवारी) सोनी व भोसे (ता. मिरज) येथे लावलेला डिजिटल फलक काढण्यास भाग पाडले.
सोनीसह परिसरातील बारा गावांमध्ये म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, पाणी मिळाल्याशिवाय मतदान करायचे नाही, असा ठराव करण्यात आला आहे. काल झालेल्या पाटगाव (ता. मिरज) येथील बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार गावागावामध्ये फलक लावण्याचा प्रयत्न करत आहेत, तर अशा व्यक्तींना वंचित गावामध्ये पाणी आल्याखेरीज येऊ द्यायचे नाही व फलक लावू द्यायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव घेऊन डोंगरवाडी योजनेचे पाणी मिळाल्याशिवाय मतदान करणार नाही, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी जगन्नाथ पाटील, अरविंद पाटील, उल्हास माळकर, चंपाताई जाधव, टी. आर. पाटील, राजाराम धडस, आप्पासाहेब पाटील, कुमार पाटील, सदाशिव पाटील, विजय गुरव, भानुदास पाटील, रमेश कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
सोनी व भोसे येथे मिरज विधानसभेसाठी इच्छुक प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी लावलेला डिजिटल फलक या संघर्ष समितीने काढण्यास भाग पाडले, त्यामुळे उर्वरित इच्छुकांनी फलक लावण्याची केलेली तयारी थांबवली आहे. बैठकीसाठी चारचाकी गाडीवर ध्वनिक्षेपक लावून उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय असते. त्यांच्यातील भावना तीव्र असल्याने आंदोलनाची धार वाढत असल्याचे दिसत आहे.