सोडत निघाली... आटपाडी, जत, वाळवा पंचायत समित्यांचे सभापती सर्वसाधारण
By अशोक डोंबाळे | Published: January 17, 2023 09:29 PM2023-01-17T21:29:11+5:302023-01-17T21:29:49+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली सोडत : मिरज अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित
अशोक डोंबाळे/सांगली
सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापतींची आरक्षण सोडत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली. यामध्ये आटपाडी, जत आणि वाळवा पंचायत समित्यांचे सभापतिपद सर्वसाधारण, तर मिरज पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित राहिले आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनेक पंचायत समित्यांचे सभापतिपद आरक्षित राहिल्यामुळे तेथील इच्छुकांना धक्का बसला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. २०१९ मध्ये आरक्षण पडलेल्या पंचायत समित्या वगळून अन्य पंचायत समित्यांसाठी आरक्षण टाकण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी मिरज पंचायत समितीचे सभापतिपद आरक्षित झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आले. यामध्ये खानापूर, पलूस, कडेगाव पंचायत समित्यांचे सभापतिपद आरक्षित ठेवण्यात आले. यामध्ये पलूस पंचायत समितीचे सभापतिपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले. सर्वसाधारण महिलांसाठी कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव पंचायत समित्यांचे सभापतिपद आरक्षित ठेवले. आटपाडी, जत, वाळवा पंचायत समित्यांचे सभापतिपद सर्वसाधारण राहिले. या ठिकाणचे इच्छूक जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीच्या जागाच लढविण्यावर भर देणार असल्याचे दिसत आहे.
चौकट
असे आहे सभापतींचे आरक्षण
पंचायत समिती आरक्षण
खानापूर ओबीसी
मिरज अनुसूचित जाती महिला
कवठेमहांकाळ सर्वसाधारण महिला
आटपाडी सर्वसाधारण
जत सर्वसाधारण
वाळवा सर्वसाधारण
पलूस ओबीसी महिला
तासगाव सर्वसाधारण महिला
कडेगाव सर्वसाधारण महिला
शिराळा ओबीसी