Sangli- नोकरी सोडून जगवतोय भटकी गाय, वासरं; १५ वर्षापासून कुमठ्याच्या बंडू पाटील यांची एकाकी झुंज
By श्रीनिवास नागे | Published: April 10, 2023 01:04 PM2023-04-10T13:04:00+5:302023-04-10T13:04:25+5:30
एसटी कंडक्टरची नोकरी सोडून निराधार भटक्या पशु पक्षाच्या संगोपनासाठी संसारावर तुळशीपत्र ठेऊन पंधरा वर्षापासून धडपड, गोमातेच्या बचावासाठी मदतीची गरज
प्रदीप पोतदार
कवठे एकंद : शेतीला जोडधंदा असणाऱ्या पशुपालनाबाबत शेतकरी वर्गात कमालीची उदासीनता आहे. पशुखाद्याचे वाढते दर, औषध उपचार आणि कमी दूध उत्त्पादन यामुळे पशुपालन न परवडणारे आहे. दुधाचे उत्पादन कमी देणारी देशी गाय तर दुर्मिळच बनली आहे. असे वास्तव चित्र असताना भाकड झालेल्या, मरणाला टेकलेल्या, सोडून दिलेल्या भटक्या बेवारस गाय, वासरांच्या जगण्यासाठी कुमठे ता. तासगाव येथील विश्वनाथ उर्फ बंडू पाटील गेल्या पंधरा वर्षापासून एकाकीपणे झुंज देतोय.
कुमठे गावापासून अडीच किलोमीटरवर उत्तरेकडे असणाऱ्या वडिलोपार्जित सात गुंठे जागेवर बेवारस वृद्ध गायींचा गोठाच त्यानं सांभाळला आहे. एसटी कंडक्टरची नोकरी सोडून निराधार भटक्या पशु पक्षाच्या संगोपनासाठी संसारावर तुळशीपत्र ठेऊन पंधरा वर्षापासून त्याची धडपड सुरू आहे. सध्या पन्नाशी पार केलेला विश्वनाथ उर्फ बंडू पाटील चाळीसहून अधिक म्हाताऱ्या, मारक्या, खोडील देशी गाईं वासरांच्या सांभाळासाठी अनेक आव्हानांना तोंड देत आहे. दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या देशी गोधनाचा सांभाळ करणारा बंडू पाटील गोमातेसाठी जणू "विश्वनाथ'' बनून गाय वासरांच्या संसारात रममाण झाला आहे.
नेहमीच मळकटलेल्या पोशाखात असणाऱ्या बंडू पाटील यांची अव्याहतपणे सुरू असलेली स्वच्छ मनाची गोसेवा पांढरपेशी पोशाखातील, मतलबी समाजासाठी आदर्श देणारी आहे. मूक जनावराप्रती जपलेली आपुलकी समाजासाठी आदर्शवत आहे. गो संवर्धनाचे वेड असलेला हा अवलियाने समाजमनांना पाझर फुटेल असं काम निरपेक्ष निर्मळमनाने जोपासत आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची परिसरातील अनेकांनी दाद घेत कधी चाऱ्यासाठी, कधी निवाऱ्यासाठी मदत करतात. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकीतून कुमठेतील मनोज पाटील हे चाऱ्यासाठी तर मनेराजुरीच्या नंदू पवार यांनी पाण्यासाठी बोअर मारून दिली आहे. बोअर मधील मोटार, कडबा कुट्टी मशीनसाठी इस्कॉन हरेकृष्ण भक्त यांनी मदत केली तर दीपक पाटील, प्रशांत पाटील, सावर्डेचे प्रदीप माने, विनायक कदम यांच्या सह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
गो मातेच्या संवर्धनासाठी पाठबळाची गरज
जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गाई येतात. पण वृद्ध जनावरांची वाढणारी संख्या पाहता सांभाळण्यासाठी पुरेसा चारा, बंदिस्त निवारण असल्याने मोठी गैरसोय होत आहे. पडेल त्या संकटाला तोंड देत हात पसरत हा गोसंवर्धनाचे विश्व एकट्या विश्वनाथने आजवर पेलेले आहे. पण आता गरज आहे ती मदतीची. बंदिस्त निवारा, दैनंदिन चारा, जनावरांचे औषध उपचार यासाठी दानशूर, पशु प्रेमींनी, सामाजिक संस्थांनी तसेच शासन स्तरावरून मदत करण्याची आवश्यकता आहे.
"नफा तोट्याची बेरीज वजाबाकी करणाऱ्या मंडळींनी गायी, भाकड जनावरे सोडून दिल्या जातात. त्यांचा आधार देण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असून हव्याहतपणे हे चालूच ठेवणार आहे.तरी गोमाता प्रेमींनी मदतीचा हात द्यावा. यातून माझ्या कामाला पाठबळ मिळेल असे आवाहन त्यांनी दैनिक लोकमतशी बोलताना केले.