डावा कालव्याचे काम बंद!
By admin | Published: November 2, 2014 10:16 PM2014-11-02T22:16:25+5:302014-11-02T23:29:42+5:30
कालव्याची दुरवस्था : उर्जितावस्था कधी येणार?
सहदेव खोत - पुनवत
मागील दोन वर्षापासून बंद पडलेली कामे, जागोजागी उखडलेले काँक्रिटीकरण, आत आणि बाहेर झुडपांचे वाढलेले साम्राज्य यामुळे शिराळा तालुक्यात वारणा डावा कालव्याची दुरवस्था झाली आहे. केंद्रात आणि राज्यात नव्यानेच सत्तारुढ झालेल्या भाजप सरकारच्या काळात तरी या कालव्याला उर्जितावस्था येणार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.
दोन-तीन वर्षापूर्वी डाव्या कालव्याची कामे जागोजागी जोमाने सुरू होती. अनेक ठिकाणी कालव्याची साफसफाई करून साईड काँक्रिटची कामे करण्यात आली. ही कामे विशेषत: १0 कि.मी.पासून पुढे करण्यात आली. रिळे जलसेतूपर्यंत पाण्याची चाचणीही घेण्यात आली होती.
कामाचा ठेका घेणाऱ्या कंपनीने कधीकाळी कामे केल्यानंतर आता आपला गाशा गुंडाळला आहे. साधारणत: रिळे जलसेतूपासून ते अगदी मांगले देववाडीपर्यंत ही कामे अर्ध्यावरच राहिली आहेत. कित्येक ठिकाणी केलेले अस्तरीकरण निकृष्ट कामामुळे उखडून गेले आहे. शिल्लक राहिलेल्या अस्तरीकरणाला भेगा पडल्या आहेत. त्यामधून झाडे—झुडपे उगवली आहेत. अस्तरीकरण नीट न झाल्यामुळे कालव्यात पावसाळ्यात साठलेले पाणी झिरपून निघून गेले आहे. कालव्याच्या दुतर्फा तसेच आत मोठमोठी झाडे उगवल्यामुळे कालव्याचा धोका वाढला आहे. शिवाय 0 ते २0 कि.मी.पर्यंतच्या पट्ट्यात गळतीची समस्या मोठी आहे. सततच्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी नापीक बनल्या आहेत.
तालुक्यात विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक या नेत्यांनी वाकुर्डे बुद्रुक योजना व डावा कालवा पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सध्या निधीअभावी या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना रखडल्या आहे. कॉँग्रेस शासनाच्या काळात या योजनांसाठी निधी आला व कामेही झाली. आता कामात राहिलेल्या उणिवा दूर करून उर्वरित कामे मार्गी लावण्याची गरज आहे.
कालव्याचे काँक्रिट तुटलेल्या ठिकाणी कोटिंग कागदाची चोरीही झाली आहे. कामे बंद असल्यामुळे खोलीच्या ठिकाणी असलेल्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दरवर्षी कालव्यात पडून कित्येक जनावरांचा मृत्यू होत आहे. काही ठिकाणी बसविलेले लोखंडी पूल कालबाह्य झाले आहेत. सततच्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी नापीक बनल्या आहेत.