Sangli: नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या सर्वच कारखान्यांवर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री सुरेश खाडेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:36 PM2023-05-06T12:36:15+5:302023-05-06T12:36:37+5:30
नदी व घाट अयोध्यासारखा व्हावा
सांगली : कारखान्यांनी नदीमध्ये दूषित पाणी सोडणे थांबवण्यासाठी शेवटचा इशारा देत आहे, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिला. नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त राहण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.
सांगलीत चला जाणू या नदीला अभियानांतर्गत कृष्णाकाठी माईघाटावर शुक्रवारी खाडे यांच्या हस्ते कलश पूजन झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपवनसंरक्षक नीता कट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, जल बिरादरीचे नरेंद्र चुघ आदी उपस्थित होते.
खाडे म्हणाले, वाढते नागरीकरण व औद्योगिकरणामुळे पाण्यावरील ताण वाढला आहे. नद्यांतील गाळामुळे वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे नदीला जाणून तिच्या समस्या सोडवण्यासाठी नदी संवाद यात्रा सुरू केली आहे. जिल्ह्यातील सातही नद्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नियोजन समितीतून निधी देऊ.
यावेळी खाडे यांच्या हस्ते कृष्णा, माणगंगा, कोरडा, महाकाली, येरळा, अग्रणी व तीळगंगा नद्यांतील पाण्याचे पूजन झाले. जलप्रतिज्ञा देण्यात आली. प्रास्ताविक ज्योती देवकर यांनी केले. सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केले.
यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. रवींद्र व्होरा, डॉ. मनोज पाटील, अंकुश नारायणकर, सागर पाटील, प्रकाश पाटील, संपतराव पवार, जाई कुलकर्णी, सचिन पवार, अभिनंदन हारुगडे, डी. एस. साहुत्रे, सहायक अधीक्षक अभियंता तृप्ती मुकुर्णे, उपकार्यकारी अभियंता श्वेता दबडे आदी उपस्थित होते.
नदी व घाट अयोध्यासारखा व्हावा
खाडे म्हणाले, नुकताच मी अयोध्येला जाऊन आलो. तेथे नदीची स्वच्छता, घाटांचे सुशोभीकरण पाहण्यासारखे होते. सांगलीतही तसेच सुशोभीकरण व स्वच्छतेसाठी प्रयत्न व्हावेत.