‘सर्वोदय’च्या मैदानात दिग्गज मल्ल उतरणार
By admin | Published: October 4, 2016 12:01 AM2016-10-04T00:01:19+5:302016-10-04T01:02:18+5:30
सभांना श्रीगणेशा : प्रचारात गाजणार कारखान्याच्या मालकीचा मुद्दा; निवडणुकीचे धुराडे पेटले
अविनाश कोळी -- सांगली -सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे धुराडे पेटले असून, यंदाची निवडणूक ही अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आ. जयंत पाटील आणि माजी आ. संभाजी पवारांची कारखान्याच्या ताब्यावरून रंगलेली कुस्ती निवडणुकीत निकाली ठरणार आहे. त्यामुळे दिग्गज नेत्यांची फौज दोन्ही बाजूंनी रणांगणात उतरणार आहे.
सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे. सर्वोदय सहकारी साखर कारखाना सध्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे. राजारामबापू कारखान्याच्या व्यवस्थापनामार्फत कारखान्याचे निर्णय घेतले जातात. राजारामबापू कारखान्याचे युनिट म्हणून हा कारखाना सुरू आहे. स्थापनेपासून हा कारखाना संभाजी पवार गटाच्या ताब्यात होता. २००८ मध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या या कारखान्याला राजारामबापूने आर्थिक मदत देऊन तीन वर्षाचा करार केला होता. करार संपल्यानंतर राजारामबापू कारखाना आणि पवार गटात कारखान्याच्या ताब्यावरून तसेच देय असलेल्या रकमेवरून वाद रंगला.
जयंत पाटील आणि संभाजी पवारांच्या मैत्रीपूर्ण नात्याला या वादाने सुरूंग लागला. संभाजी पवारांनी जयंत पाटील यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करून तोफ डागली. जयंत पाटील यांच्या गटानेही पवार गटावर शाब्दिक हल्ला केला. राज्यभर वादाचे रंग उधळले गेले. हा वाद इतका टोकाला गेला की, संपूर्ण राज्यात सर्वोदय कारखान्याचे नाव चर्चेत आले. न्यायालयीन लढाया सुरू झाल्या.
आजतागायत या साखर कारखान्याच्या मालकीचा वाद शांत झालेला नाही. त्यामुळेच सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांना चितपट करण्यासाठी हे दोन्ही नेते सरसावले आहेत.
जयंत पाटील यांच्यातर्फे त्यांच्याकडील पहिल्या फळीतील नेत्यांची फौज उतरणार आहे, तर पवार गटाकडूनही जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील, खासदार राजू शेट्टी, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी नेते मैदानात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली जाणार आहे.
बैठकांना सुरुवात
पवार गटाने यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कारखाना कार्यक्षेत्रातील गावांत सभासदांच्या बैठका सुरू आहेत. दुधगाव, माळवाडी, सावळवाडीनंतर सोमवारी कसबे डिग्रज येथे या गटाने बैठक घेतली. अद्याप प्रचार बैठकांचे कोणतेही नियोजन ठरलेले नसले तरी, मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर सर्व गावांमध्ये बैठका घेण्यात येणार असल्याचे या गटाकडून सांगण्यात आले.
जयंत पाटील गटही तयारीत
जयंत पाटील यांच्या गटानेही कारखाना निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचेही वर्चस्व असल्याने हा सामना चुरशीचा ठरण्याची चिन्हे आहेत. पवार गटाच्या सुरू असलेल्या हालचालींवर जयंत पाटील यांच्या गटाने नजर ठेवली आहे.
लवाद, न्यायालयाने निर्णय देऊन राजारामबापू कारखाना सभासदांच्या ताब्यात सर्वोदय कारखाना देण्यास तयार नाही. हा मुद्दा आम्ही सभासदांसमोर मांडत आहोत. ही निवडणूक जयंत पाटील विरुद्ध सभासद अशीच राहील. शेतकरी सभासदांना या गोष्टीची कल्पना असल्याने तेच आता योग्य निवाडा करणार आहेत.
- पृथ्वीराज पवार, अध्यक्ष, सर्वोदय सहकारी साखर कारखाना.