विधानसभेला अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही - विशाल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:47 PM2024-09-07T13:47:01+5:302024-09-07T13:47:24+5:30
तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी टिप्पणी खासदार ...
तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी टिप्पणी खासदार विशाल पाटील यांनी केली.
सावर्डे (ता. तासगाव) येथे आयाेजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विशाल पाटील म्हणाले, लाेकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही. लोकसभेवेळीच विधानसभेचे घोडेमैदान अजून लांब आहे. तेव्हा साेबत बसूनच विधानसभेचा निर्णय घेऊ.
मात्र लाेकसभेत संजयकाकांना राेखायचेच, हा शब्द देऊन त्यांनी जाहीर भूमिका घेतली. त्याची जाणीव ठेवणारा हा विशाल पाटील आहे. या प्रेमाचा परतावा कसा करायचा ते वसंतदादा घराण्याला कळते. माजी खासदार दहा वर्षात जेवढे बोलले तेवढे मी एका शपथविधीला बोललो. त्यांनी सारे देव पाण्यात घातले. पण एकही देव यावेळी त्यांना पावला नाही.
अजितराव घोरपडे म्हणाले, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने खासदार बदलले. ही मोहीम यशस्वी झाली. आमचाच खासदार व आमचाच आमदार, या भूमिकेने मतदारसंघाचे वाटोळे झाले आहे. जिल्ह्यात एक वेगळी संघटना उभी करणार आहे.
यावेळी राजवर्धन घोरपडे, स्वप्निल पाटील, डॉ. प्रताप पाटील, महादेव पाटील, आर. डी. पाटील, पांडुरंग पाटील, अरुण खरमाटे यांच्यासह शेतकरी विकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीतील प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. सर्वच नेत्यांनी अंजनी आणि चिंचणीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.
विशाल पाटील यांची बगल
शेतकरी मेळाव्याचा एकंदरीत सूर अंजनी-चिंचणीला सक्षम तिसरा पर्याय देण्याचा होता. उपस्थितांनी अंजनीच्या नेतृत्वावरही जोरदार टीका केली. मात्र भाषणाला उभे राहिल्यानंतर खासदार पाटील यांनी २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आर. आर. आबांच्या चिरंजीवांनी मला चांगली मदत केली, असा उल्लेख केला.
मंचावर अनेकांनी भाषण केले पण माईकची व्यवस्था चांगली नव्हती आणि माझ्या कानात पाणी गेल्यामुळे सगळं नीट ऐकू आलं नाही, असा टोला लगावत मूळ विषयाला बगल दिली. याचवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील आणि निमणीचे आर. डी. पाटील यांना माजी खासदारांनी भुरळ पाडल्याचा टोमणाही लगावला.