लिंबू, हळदकुंकू, टाचण्या टोचलेली बाहुली; सांगलीत ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार
By अशोक डोंबाळे | Published: November 3, 2023 05:51 PM2023-11-03T17:51:35+5:302023-11-03T18:23:34+5:30
प्रचार शिगेला : सत्ताधारी-विरोधी गटामध्ये जादूटोण्यावरून आरोप-प्रत्यारोप
सांगली : हरिपूर (ता. मिरज) ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. गावाच्या वेशीवर जादूटोणा आणि भानमतीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. रस्त्याच्या कडेला आणि कमानी जवळ लिंबू, हळदकुंकू, टाचण्या टोचलेली बाहुली गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. या प्रकारानंतर गावातील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत.
जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली होती. १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले, तर ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ८० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २१८, तर सदस्यपदांसाठी ६६४ जागांसाठी १ हजार ५०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार असल्याने गावागावात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सांगली शहरानजीक असणाऱ्या हरिपूर गावामध्ये मात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार निवडणुकीमध्ये पुढे आला आहे.
हरिपूर गावाच्या वेशीवर गावची कमान असणाऱ्या ठिकाणी भानामती आणि जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास लिंबू हळद-कुंकू टाचण्या टोचलेली बाहुली यांसह जादूटोण्याचे साहित्य कमानीच्या पायाशी ठेवल्याचे शुक्रवारी सकाळी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती लगेच राजकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांनी मात्र जादूटोणा केल्याने कोणाची सत्ता येत नाही अथवा जात नाही उलट लोक काम बघून मतदान करतात, असे आरोप करत आहेत. सदरचा प्रकाश निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी जादूटोण्यासाठी ठेवलेले साहित्य हे पेटवून टाकले. एकीकडे स्मार्ट जमान्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांमुळे चांगली चर्चा रंगली होती.
चुरशीने प्रचार
विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपेक्षा अधिक चुरशीनं ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या जातात. सांगलीतील हरिपूरमध्ये जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे गुन्हे दाखल करा : मुक्ता दाभोलकर
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काही उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार व मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार करतात. ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, असे अघोरी प्रकार करणाऱ्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात यांनी केली.