सावकार दाम्पत्याला अटक
By admin | Published: January 31, 2016 12:42 AM2016-01-31T00:42:10+5:302016-01-31T00:45:14+5:30
महिलेचे घर बळकावले : दीड लाखाचे मागितले साडेपाच लाख; कुपवाडमध्ये कारवाई
कुपवाड : अहिल्यानगरमधील महिलेचे घर बेकायदेशीररीत्या बळकावल्याप्रकरणी कुपवाडच्या सावकार पती-पत्नीला शुक्रवारी रात्री कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पांडुरंग कृष्णा आवटे (वय ५६) व सुनीता ऊर्फ राणीबाई पांडुरंग आवटे (४५) अशी त्यांची नावे आहेत.
घराची बेकायदेशीर कब्जेपट्टी व खरेदी पावती करण्याबरोबरच चक्रवाढ व्याजाने पैशाची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद केला आहे़
अहिल्यानगरमधील कल्पना आप्पाजी राऊत (५०) यांनी पांडुरंग आवटे व सुनीता आवटे या पती-पत्नींकडून वर्षभरापूर्वी दीड लाख रुपये दहा टक्के व्याजदराने घेतले होते़ त्यासाठी आवटे दाम्पत्याने राऊत यांच्याकडून घराची बेकायदेशीररीत्या कब्जेपट्टी व खरेदी पावती करून घेतली होती़ त्यावर राऊत यांच्या बनावट सह्या घेतल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले़ आवटे दाम्पत्याने कब्जेपट्टीनंतर घरही बळकावले होते.
सव्वा वर्षाने कल्पना राऊत यांनी ती रक्कम परत करण्याची तयारी दर्शविल्यानंतर आवटे दाम्पत्याने चक्रवाढ व्याजदराने साडेपाच लाखांची मागणी त्यांच्याकडे केली़
घर हवे असेल, तर साडेपाच लाख रुपये परत करावेत, असा दम भरला होता. अखेर राऊत यांनी कुपवाड पोलिसांत शुक्रवारी आवटे पती-पत्नीविरोधात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद केला़
गुन्हा नोंद झाल्यानंतर कुपवाड पोलिसांनी शुक्रवारी रात्री खासगी सावकारीप्रकरणी दाम्पत्याला संशयित म्हणून अटक केली़ शनिवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली़ याबाबत हवालदार प्रवीण यादव तपास करीत आहेत़ (वार्ताहर)