तडवळेत बिबट्याचा सलग दुसऱ्या दिवशी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:28 PM2022-02-03T14:28:30+5:302022-02-03T14:28:55+5:30

भरदुपारच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवल्याने ऊसतोड कामगारांमध्ये भितीचे वातावरण

Leopard attack for the second day in Tadavale sangli | तडवळेत बिबट्याचा सलग दुसऱ्या दिवशी हल्ला

तडवळेत बिबट्याचा सलग दुसऱ्या दिवशी हल्ला

googlenewsNext

शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथील गोल पाणंद येथे ऊसतोड कामगाराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी ऊसतोड कामगार रमेश कारभारी आल्हाद (वय ५२, रा. माजलगाव, जि. बीड) यांच्यावरही हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या पायावर पंजा मारून जखमी केले आहे. ही घटना भरदुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.

गोल पाणंद येथील शिवाजी तुकाराम पाटील यांच्या शेतातील ऊसतोड सुरू होती. रमेश आल्हाद यांच्यासह ७-८ जण ऊसतोडणी करत होते. दरम्यान, रमेश लघुशंकेसाठी काही अंतरावर गेले. यावेळी अचानक मागून बिबट्याने त्यांना पकडण्यासाठी पंजा मारला. मात्र, तो पायावर मारला गेला. रमेश यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या उसात पळाला. जखमी रमेश यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

मंगळवारच्या हल्ल्यातील जखमी गणेश कामबीलकर या बालकावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चांगली आहे.

वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल हणमंत पाटील, वनरक्षक अक्षय शिंदे, क्षेत्रसहाय्यक बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बिबट्याची शोधमोहीम सुरू केली.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी वनक्षेत्रपाल जाधव यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सांगितले आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्याने नागरिक, शेतकरी, ऊसतोड कामगार यांच्यात घबराटीचे वातावरण आहे. बिबट्या व गव्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी आहे.

अकरा महिन्यांनी पुन्हा हल्ला

तडवळेत दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी जाईच्या विहिरीजवळ बिबट्याच्या हल्ल्यात सौफियान शमसुद्दीन शेख या बालकाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वीही दोघांवर, तर मंगळवारी गणेश श्रीराम कामबीलकर या बालकावर हल्ला केला होता.

Web Title: Leopard attack for the second day in Tadavale sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.